मोबाईलच्या नादी लागली युवापिढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:21 IST2021-05-28T04:21:31+5:302021-05-28T04:21:31+5:30
चंद्रपूर : मागील वर्षीसारखाच यावर्षीही कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागत आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम करणारे ...

मोबाईलच्या नादी लागली युवापिढी
चंद्रपूर : मागील वर्षीसारखाच यावर्षीही कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागत आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आता पुन्हा मोबाईलच्या नादाला लागले आहेत. पुस्तकांचे वाचन करून ज्ञान मिळावे, अशी पालकांची इच्छा आहे. मात्र युवापिढी मोबाईलच्या नादी लागल्याचे चित्र असून, पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी चंद्रपूर जिल्ह्यात चांगले वातावरण निर्माण झाले. मात्र मागीलवर्षी तसेच यावर्षीही लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. अलिकडे स्मार्ट फोन आणि स्वस्तातील इंटरनेट पॅकेजमुळे तरुणाई मोबाईलमध्येच व्यस्त झाली आहे.
मागीलवर्षी त्याचप्रमाणे याहीवर्षी दोन महिन्यांपासून लॉकडाऊन झाले. ग्रंथालये बंद असल्याने मोबाईल व अन्य संवाद साधनांकडे मुलांचा कल वाढला आहे. मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शहरातील वाचनालयात अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. मुलांसाठी कथासंग्रह, मासिके, सांस्कृतिक, रहस्यमय कथा, वैज्ञानिक ऐतिहासिक, स्पर्धात्मक आदी विविध प्रकारची पुस्तके आहेत. विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकेही वाचनालयासाठी उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुटीचा योग्य वापर केल्यास यशाचा मार्ग मिळतो. पण, याउलट चित्र सध्या दिसत असून, यामुळे मात्र पालकांची चिंता चांगलीच वाढली आहे. काही पालक यावर उपाय शोधत आहेत. मात्र त्यांचाही नाईलाज होत आहे.