पारडगावातील युवक झाले रक्तदाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:47+5:302021-02-23T04:43:47+5:30
ब्रह्मपुरी: तालुक्यात बाहेरून आलेल्या रुग्णांना रक्ताची चणचण पाहून मनात जनसेवेचे ध्येय ठेवून मागील काही वर्षांपासून पारडगाव येथील मंगल पारधी ...

पारडगावातील युवक झाले रक्तदाते
ब्रह्मपुरी: तालुक्यात बाहेरून आलेल्या रुग्णांना रक्ताची चणचण पाहून मनात जनसेवेचे ध्येय ठेवून मागील काही वर्षांपासून पारडगाव येथील मंगल पारधी या युवकाने एक रक्तविरांचा व्हाॅटसॲप ग्रुप तयार केला. कुणालाही रक्ताची गरज भासली तर या ग्रुपमधील सदस्य सक्रिय होऊन रक्तदान करीत आहेत.
ब्रम्हपुरी शहर हे आरोग्यनगरी म्हणून विदर्भात ओळख आहे. येथील रूग्णालयात येथील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,वर्धा, भंडारा, येथील रुग्ण उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात येत असतात. अनेकांना रक्ताची गरज असते. त्या वेळेस रुग्णांचे नातेवाईक खूप विवंचनेत दिसत असतात व रक्तासाठी धावपळ करीत असतात. रक्तासाठी दुप्पट किंमत सुद्धा मोजावी लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून पारडगाव येथील मंगल पारधी, दीपक मेत्राम, महेश अलोणे, पवन मेश्राम, अक्षय राऊत या युवकांनी त्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना निःशुल्क रक्त पुरवठा करुन ब्रम्हपुरी तालुक्यात एक रक्त वीर म्हणून ओळख निर्माण केली आहे. रविवारी रात्री १.३० वाजता दरम्यान नागभीड येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक यांना रक्ताची गरज असल्याचे फोन आले व लगेच मंगल पारधी व त्यांचे सहकारी रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी मध्यरात्री रुग्णालयात जाऊन रक्त दिले. मंगल पारधी व त्यांचे सहकारी यांच्या या कार्यामुळे रुग्णांना सहजपणे निःशुल्क रक्त उपलब्ध होत आहे.