अंत्यसंस्कार तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST2021-04-15T04:27:12+5:302021-04-15T04:27:12+5:30
चंद्रपूर : मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. पण तो अकाली नको. त्यामुळे अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे कार्य म्हणून कुणीही ...

अंत्यसंस्कार तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही..!
चंद्रपूर : मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. पण तो अकाली नको. त्यामुळे अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे कार्य म्हणून कुणीही मदतीला धावून जातात. मग ते शहर असो की गाव ! मात्र, कोरोना महामारीने ही माणुसकी आटली. काळजाशी नाते असलेले जीवाभावाचे दुरावले. कोरोना संसर्गाने दगावलेल्या एका व्यक्तीचा अंत्यसंस्कार करायचा आहे, अशी माहिती कुटुंबाला दिल्यानंतर ‘तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही’ असे उत्तर ऐकून आम्ही सुन्न झालो... सांगत होते मृतांवर अंत्यसंस्कार करणारे चंद्रपूर मनपाचे देवदूत कामगार...
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जिल्हा हादरला. दोन आठवड्यापासून तर दररोज दहापेक्षा अधिक बाधितांचा मृत्यू होत आहे. मंगळवारपर्यंत ५१६ जणांचा मृत्यू झाला तर बाधितांची संख्या ३५ हजार ५१३ वर पोहोचली आहे. मृतांवर अंत्यसंस्कार कसा करावा, अंत्यसंस्काराची जबाबदारी कुणाची, कुटुंबांना माहिती कशी द्यायची, आपल्या स्नेहीजनाचे अखेरचे दर्शन कसे घ्यावे, दुरून धार्मिक विधी करायची परवानगी आहे काय, किती व्यक्ती उपस्थित राहू शकतात, यासारख्या अनेक प्रश्नांबाबत राज्य सरकारने गतवर्षीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. चंद्रपूर शहरातील कोविड रुग्णालयात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महानगर पालिकेच्या विशेष पथकाकडे आहे. या पथकाला आरोग्यसुविधा पुरविण्यासोबतच प्रशिक्षणही देण्यात आले. मृताच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली जाते. हा साराच प्रकार प्रचंड वेदना देणारा आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी कोरोनाने दगावलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाला अंत्यसंस्काराची माहिती दिल्यानंतर ‘तुम्हीच उरकवा, आम्ही येऊ शकत नाही’ असे उत्तर ऐकून अंत्यसंस्कार पथकातील सारेच देवदूत अवाक झाले. कोणाच्याही आयुष्याची अशी दुर्दैवी अखेर होऊ नये, हीच भावना त्यांचे पाणावलेले डोळे सांगत होते.
अंत्यसंस्कारासाठी दहा जणांचे पथक सज्ज
चंद्रपुरात कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढली. मृत्यूंनी साऱ्यांनाच हादरा बसला. कोरोना केव्हा संपेल हे सांगता येत नाही. मात्र, दररोजच्या मृतांच्या संख्येमुळे नागरिकांना सावध राहावेच लागणार आहे, अशी सूचना कामगार करतात. यापूर्वी अंत्यसंस्कार पथकात १० कामगार होते. आता पुन्हा १० जणांची नियुक्ती झाली. दोन रुग्णवाहिका व एक शवदाहिनीही सज्ज आहे.
जागेचा प्रश्न नाही, धार्मिक विधीला परवानगी
चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेटबाहेरील आरवट मार्गावर अंत्यसंस्काराची जागा उपलब्ध झाली. या ठिकाणी रात्री १२ वाजतापर्यंतही अंत्यसंस्कार केले जात आहेत. प्रेत जळायला चार तास लागतात. तोपर्यंत एक सुरक्षा कर्मचारी तिथे तैनात असतो. जागेचाही प्रश्न नाही.
धार्मिक विधीला परवानगी
पीपीई किट घालून कुटुंंबातील व्यक्तीच्या हाताने भडाग्नी देणे अथवा दुरून धार्मिक विधी करण्यास परवानगी आहे. परंतु, प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करावे लागते, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.
मृताचे कुटुंब येईपर्यंत प्रतीक्षा
शवागरात ठेवलेल्या मृतांची नावे आरोग्य कर्मचारी वाचून दाखवितात. मृताचे कुटुंबीय आले तर मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला जातो. कुटुंबातील कुणीच उपस्थित नसतील तर काही तास प्रतीक्षा केली जाते. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाते.