यंदाच्या गणेशोत्सवातून डीजे करा बाद
By Admin | Updated: September 3, 2016 00:31 IST2016-09-03T00:31:29+5:302016-09-03T00:31:29+5:30
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरू नका, अशा पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला चंद्रपुरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवातून डीजे करा बाद
पोलिसांचे आवाहन : गणेश मंडळांनीही दिले आश्वासन
चंद्रपूर : ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरू नका, अशा पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला चंद्रपुरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी ओळखून गणेश उत्सवादरम्यान डीजे न वाजविण्याचे मंडळांनी आश्वासन दिले आहे. मंडळांनी हे आश्वासन पाळले तर ध्वनी प्रदूषण रोखण्यात चंद्रपूर जिल्हा एक आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
गुरुवारी पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथील ड्रील शेड येथे जिल्हा शांतता समिती, एनजीओ, पत्रकार तसेच जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय पुढे आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपायुक्त विजय इंगोले, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत उपस्थित होते. यावेळी संदीप दिवाण यांनी आगामी गणेशोत्सव मंगलमय व ध्वनी प्रदूषणमुक्त कसा होईल, यावर मार्गदर्शन केले. ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत न्यायालयसुद्धा आग्रही आहे. कायद्याचे उल्लंघन झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे त्यांना निर्देश देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
एका मंडळासाठी तीन वाहने
विसर्जन मिरवणुकीसाठी एका मंडळाला यंदा तीनपेक्षा जास्त वाहनाची परवानगी देण्यात येणार नाही, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या नियमांमध्ये व कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही भेदभाव मंडळाची प्रतिष्ठा पाहून केला जाणार नाही, असेही पोलीस विभागाकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
मनपातर्फे २० कृत्रिम तलाव
मनपाद्वारे विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. विसर्जनादरम्यान प्रसाद वाटप करण्याकरिता रस्त्यावर स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात येणार नाही, जल प्रदूषण रोखण्याकरिता मनपाकडून २० कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.