यावर्षी घोडाझरीचा ‘ओव्हर फ्लो’ जरा कठीणच
By Admin | Updated: August 21, 2016 02:05 IST2016-08-21T02:05:30+5:302016-08-21T02:05:30+5:30
सद्या स्थितीत पावसाची एकंदर स्थिती आणि गती लक्षात घेता यावर्षी घोडाझरीचा ‘ओव्हर फ्लो’ मुश्किलच दिसत आहे.

यावर्षी घोडाझरीचा ‘ओव्हर फ्लो’ जरा कठीणच
नागभीड : सद्या स्थितीत पावसाची एकंदर स्थिती आणि गती लक्षात घेता यावर्षी घोडाझरीचा ‘ओव्हर फ्लो’ मुश्किलच दिसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून तलाव ‘ओव्हर फ्लो’ होत नसल्याने पावसाळी पर्यटकांचा चांगला हिरमोड होत आहे.
२०१३ साली घोडाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला होता. त्या अगोदरही हा तलाव अनेकदा ओव्हर फ्लो झाला. पण गेल्या तीन वर्षांपासून ओव्हर फ्लोच्या बाबतीत हा तलाव सतत हुलकावणी देत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या प्रारंभ अतिशय दमदार पाऊस झाल्याने या तलावाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली होती. असाच पावसाचा जोर कायम राहिला तर घोडाझरी तलाव यावर्षी निश्चितच ओव्हर फ्लो होईल असा अनेकांचा अंदाज होता. पण हा अंदाज आता अंदाजच राहण्याची शक्यता आहे. अजूनही तलाव ओव्हर फ्लो होण्यास आणखी दोन फुट पाण्याची गरज असून ही उणीव भरून काढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.
‘ओव्हर फ्लो’ न होण्यास आणखी एक असे कारण सांगण्यात येते की, आता लवकरच घोडाझरी तलावाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. एकदा घोडाझरीतून शेतीसाठी पाणी सुरू झाले की, रोज हजारो लिटर पाण्याचा उपसा या तलावातून होत राहील. त्यामुळेही ‘ओव्हर फ्लो’ होण्यास मोठी आडकाठी निर्माण झाली आहे. आता शेतीसाठी पाणी ही शेतकऱ्यांची आवश्यक गरज निर्माण झाली असून कालवे व्यवस्थित असते, तर १५ आॅगस्टपासूनच पाणी सोडणे सुरू करण्यात आले असते. पण ते आता एखाद्या आठवड्यात निश्चित सुरू होणार आहे.
एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून घोडाझरीची पूर्व विदर्भात प्रसिद्ध आहे. या घोडाझरीवर पर्यटकांची वर्षभर गर्दी तर असतेच. पण त्याचबरोबरच घोडाझरीच्या ओव्हर फ्लोचा खास एक पर्यटक वर्ग आहे. हा वर्ग नेहमीच घोडाझरी ओव्हर फ्लो होण्याची प्रतीक्षा करीत असतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या पर्यटक वर्गाला या प्रतीक्षेवरच समाधान मानावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)