दुष्काळाने वाढविली बळीराजाची चिंता
By Admin | Updated: November 13, 2015 01:10 IST2015-11-13T01:10:13+5:302015-11-13T01:10:13+5:30
हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. वारंवार होणाऱ्या नापिकी व दुष्काळामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना लागून आहे.

दुष्काळाने वाढविली बळीराजाची चिंता
नापिकीमुळे त्रस्त : कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा ?
गुंजेवाही : हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. वारंवार होणाऱ्या नापिकी व दुष्काळामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना लागून आहे.
सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत. त्यांचे सारे काही उधार उसणवारीवर चालते. पेरणीसाठी लागणारा पैसा कुठून आणला, असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला असता शेतकऱ्यांनी सोसायटी, राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतल्याचे, बचत गटातून कर्ज घेतल्याचे सांगितले. पेरणी, रोवणी ते पीक घरात येईपर्यंत शेतकऱ्यांना जागोजागी पैसाच मोजावा लागतो. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांचा खर्च व उत्पन्न याचा हिशोब जुळत नाही. पीक हाती येताच उधार उसणवारी फेडण्यात शेतकऱ्यांची दमछाक होते. यावर्षी तर पिकानेही चांगलाच दगा दिला. यावेळी पुरेपूर रोवणे झाले नाही. पावसाने दगा दिल्यामुळे हाती येणाऱ्या पिकाचीसुद्धा उतारी अत्यंत कमी होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच बाजारात शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. त्यातूनच शेतकरी गळ्याभोवती फास अथवा विष प्राशन करुन आत्महत्या करीत असतात वत्यांचे कुटुंब उघड्यावर पडत असते. घराचा आधार गेल्याने त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. भारत कृषी प्रधान देश म्हणविणारे नेते शेतकऱ्यांच्या मरणानंतर त्यांच्या कुटुंबाकडे फिरकूनही बघत नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मृत्यू पश्चात सरकारी मदतीसाठी पात्र अपात्रतेच्या कसोटीला समोरे जावे लागते. अथक परिश्रम घेवून शेतकरी काळ्या आईची ओटी भरतो. परंतु पदरी निराशाच पडते. यावर्षी खरीप हंगाम वाया गेल्याने पुढचा मागचा हिशोब जुळवायला शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील खर्चाचा भार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होत आहे.
दुष्काळाची लागलेली दृष्ट पुसून शेतकरी जोमाने उभा राहण्यासाठी पाहतो. मात्र अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटही त्यांच्यासमोर आवासून उभे आहे. काही मोजके शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याने या व्यवसायातही आता घट होत आहे. त्यामुळे हा पूरक व्यवसायही मोडीत काढण्याची वेळ बळीराजावर ओढवली आहे. सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
परंतु शेतकरी वर्गाने मरणाला न कवटळता हिमंतीने जगायला शिकणे आवश्यक आहे. आत्महत्येचा यावर उपाय नाही. जिवंत असेपर्यंत शेतकऱ्यांना बियाणापासून शेतमाल हातात येतपर्यंत पावलोपावली संघर्ष करावा लागतो. तोच संघर्ष कायम ठेवण्याची गरज आहे. कारण हताश होवून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची किंमत सरकारी दरबारी केवळ एक लाख रुपये आहे. शेतकरी कुटुंबियाच्या हातावर ही मदत दिली जाते. त्यापलीकडे काहीच मिळत नाही. घरातील कर्तापुरुष गेल्यानंतर मागे कुटुंबाचे काय हाल होतात, हे पाहण्यासाठी ना सरकारला वेळ आहे ना प्रशासनाला. त्यामुळे कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय मुलामुलीच्या शिक्षणपासून ते लग्नापर्यंत आर्थिक अडचणींना कुटुंबियांना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच आत्महत्या करण्यापूर्वी शेतकरी वर्गाने कुटुंबाचा विचार करणेही आवश्यक झाले आहे. शेतमालाचा भाव व उत्पादनाचा खर्च पाहता जगण्यासाठी वेगळा पर्यांय शोधून शेतीसोबत जोड व्यवसाय करणेही गरजेचे झाले आहे. असे केल्यास लाख मोलाचे जीवन संपविण्याची वेळ येणार नाही. (वार्ताहर)