जगाचा पोशिंदा झाला रामभरोसे !
By Admin | Updated: March 22, 2015 00:01 IST2015-03-22T00:01:11+5:302015-03-22T00:01:11+5:30
भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे.

जगाचा पोशिंदा झाला रामभरोसे !
गोवरी : भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे. कधी सरकारकडून तोंडाला पाने पुसली जातात तर कधी निसर्ग कोपतो. यंदा खरीप हंगाम तर गेलाच; सोबत निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामही दिलासादायक नाही. त्यामुळे जगाच्या पोशिंद्यावरच अन्नाविना उपाशी राहण्याची पाळी आली आहे.
हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गराजाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. दुबार-तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. महागडे बि-बियाणे जमिनीत पेरणीसाठी टाकल्यावर अपुऱ्या पडलेल्या पावसाने बियाणे उमलण्याधीच करपून गेले. शेतीचे सुरुवातीचे गणित चुकल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. घरी रडणाऱ्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च करीत उसणवारीने, कर्ज काढून कसीबसी शेती पिकविली.
यावर्षी कमी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. एका बॅगला एक पोते सोयाबीन, अशी शेतीची बिकट अवस्था झाली. उत्पादनाचा उतारा घटल्याने शेतीवर केलेला खर्च निघणारा नाही, अशी विपरित परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली. मात्र कुटुंबाची संपूर्ण भिस्त शेतीवर अवलंबून असल्याने पोटाचा आधार म्हणून शेती करावी लागत आहे.
शेतात राबणाऱ्या मजुरांचे भाव गगनाला भिडले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना नाईलाजाने कापूस वेचणीला पाठविण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आल्याने तो काळजातील दु:ख काळजात लपवून मोठ्या हिंमतीने संघर्षाला तोंड देत जगतो आहे. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा एकही शेतकरी नेता पुढे आला नाही. निवडणूक काळात मतांचा जोगवा मागत आश्वासनाची खैरात वाटणारे राजकीय पुढारी कुठे गेले, हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांचा मालाला अत्यल्प दर असतानाही एकही नेता कास्तकारांच्या हितासाठी रस्त्यावर आला नाही. (वार्ताहर)