जागतिक बँकेची चमू जिल्ह्यात
By Admin | Updated: May 2, 2015 01:21 IST2015-05-02T01:21:11+5:302015-05-02T01:21:11+5:30
जिल्ह्यात नव्याने जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास सुरुवात झाली असून,

जागतिक बँकेची चमू जिल्ह्यात
चंद्रपूर : जिल्ह्यात नव्याने जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास सुरुवात झाली असून, या प्रकल्पाला जागतिक बँक सहकार्य करीत आहे. जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशनच्या कामाची स्थिती जाणून घेण्यासाठी नुकतीच जागतिक बँकेच्या चमूने चंद्रपूर जिल्हा परिषदेला भेट देऊन निवडक गावांची पाहणी केली.
जागतिक बँक वॉशिंग्टन (अमेरिका) येथील अधिकारी लिआॅन वाँग, रोझर सुलान, पार्क, जागतिक बँक दिल्ली कार्यालयाने प्रतिनिधी प्रोणिता चक्रवर्ती, जागतिक बँक मुंबई कार्यालयाचे प्रतिनिधी मूर्ती यांनी नुकतीच जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत जनपथ सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी स्वच्छ भारत मिशन, जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-२ याबाबत चमूसमोर केलेल्या कामांचे सादरीकरण केले. चमूने कामाविषयी येणाऱ्या अडचणी व आव्हाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, कार्यकारी अभियंता मिलिंद चंद्रागडे, गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार, गोंडपिपरी गटविकास अधिकारी मोहितकर, पोंभूर्णा गटविकास अधिकारी व साधन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गावभेटीदरम्यान भद्रावती तालुक्यातील चिरादेवी, घोडपेठ, चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे भेट देऊन पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शौचालय व गावातील स्वच्छतेविषयी पाहणी केली. (प्रतिनिधी)