समुपदेशनातून जुळले ३० जणांचे संसार
By Admin | Updated: May 15, 2015 01:04 IST2015-05-15T01:04:21+5:302015-05-15T01:04:21+5:30
पोलीस विभागाच्या वतीने जिल्हा मुख्यालयात चालविण्यात येणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्राने मागील वर्षभरात ३८६ प्रकरणात समझोता घडवून आणला आहे.

समुपदेशनातून जुळले ३० जणांचे संसार
चंद्रपूर : पोलीस विभागाच्या वतीने जिल्हा मुख्यालयात चालविण्यात येणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्राने मागील वर्षभरात ३८६ प्रकरणात समझोता घडवून आणला आहे. तर ‘माझ काय चुकलं’ असे म्हणत संसार रूपी गाडा तोडण्याच्या वाटेवर असलेल्या ३० जणांना समुपदेशनातून एकत्र आणण्यात समुपदेशन कक्षाला यश आले आहे. समुपदेशनातून महिला सुरक्षा करणारे हे केंद्र महिला व कुटूंबाना आधार देणे यासोबतच महिला सहाय कक्षामार्फत अनेक युवती व महिलांना मनोधैर्य योजनेतंर्गत लाभ मिळवून देण्याचे काम करीत आहे.
महिलांच्या कौटुंबिक व इतर तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयात स्वतंत्र असा महिला तक्रार निवारण केंद्र कक्ष आहे. या कक्षामार्फत महिलांच्या तक्रारीचा निपटारा करण्यात येतो. सध्या चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय महिला तक्रार निवारण कक्ष आहे. बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपूरी, मूल व राजूरा या ठिकाणी अशाच प्रकारचा कक्ष प्रस्तावित आहे.
या कक्षात गेल्या वर्षभरात महिलांनी विविध प्रकारच्या एक हजार तक्रारी नोंदविल्या. यापैकी ३८६ प्रकरणात समझोता करण्यात या कक्षाला यश प्राप्त झाले. तर तर ३० जणांचे संसार तुटण्यापासून वाचविण्यात आले. उर्वरीत तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी त्या त्या पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आल्या आहेत. महिला तक्रार निवारण केंद्रात आॅनलाईन तक्रारही घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते.
केवळ कार्यालयातच महिलांच्या तक्रारी स्वीकारल्या जात नाही तर महिला व मुलींमध्ये जनजागृती करण्याचे काम या कक्षामार्फत सुरू आहे. कक्षाच्या प्रमुख असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा खरसान यांनी गेल्या सहा महिण्यात ७ महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम घेऊन युवतींच्या समस्या व त्यावरील उपाय योजनाबाबत मार्गदर्शन केले. सोबतच इंटरनेटच्या माध्यमातून होणारी युवतींची फसवणूक व अभद्र व्यवहाराबाबत जागृती निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
तक्रारदार महिलांची व युवतींची केवळ समुपदेशन करूनच हा कक्ष थांबत नाही, तर सर्वकाही सुरळीत होईपर्यंत त्यांच्या संर्पकात सुध्दा राहतो. त्यामुळे महिला सहायता केंद्रात महिला आपल्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंदवितात. महिला व बाल कल्याण विभागातर्फे या ठिकाणी समुपदेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
महिला सुरक्षेला प्राधान्य
महिलावर होणाऱ्या अत्याचाराचा निपटारा करण्यासाठी महिला सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पीडित महिलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचे काम या कक्षामार्फत करण्यात येते. त्याचबरोबर महिला व मुलींच्या अनैतिक प्रकारास प्रतिबंध करण्याकरीता या कक्षामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत.
या प्रकरणांवर
कक्षातर्फे उपाययोजना
हुंडाबळी, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालून उपाययोजना, कामकरी महिलांच्या लैगिक शोषणावर प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, बालविहावर प्रतिबंध, भ्रृणहत्या रोखणे इत्यादी कामे या कक्षामार्फत सुरू आहेत. महिलांना आॅनलाईन तक्रार नोंदविण्याची सोयही समुपदेशन केंद्रामार्फत करून देण्यात आली आहे.
ंमहिला तक्रार निवारण कक्षातर्फे महिलांना न्याय देण्यासोबतच कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्याचे काम सुरू आहे. हा कक्ष महिलांसाठी आधार असून महिलांनी व युवतींनी आपल्या तक्रारी या कक्षास नोंदविल्यास त्यांना निश्चीत न्याय दिल्या जाईल. शाळा व महाविद्यालयीन युवतींना मार्गदर्शन करून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम कक्षामार्फत सुरू आहे.
- वर्षा खरसान
पोलीस उपनिरीक्षक, कक्ष प्रमुख