कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय करणार नाही
By Admin | Updated: November 15, 2014 01:31 IST2014-11-15T01:31:44+5:302014-11-15T01:31:44+5:30
गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी आज (दि.१३) नागभीड येथे आढावा सभा घेतली. कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही,...

कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय करणार नाही
नागभीड : गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी आज (दि.१३) नागभीड येथे आढावा सभा घेतली. कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी या आढाव सभेत दिला.
येथील पं.स.च्या बचत भवन सभागृहात संपन्न झालेल्या या सभेत खा. अशोक नेते यांनी प्रारंभी जे अधिकारी गैरहजर आहेत, अशांची नावे वाचून दाखविण्याची सूचना केली. जे अधिकारी विनापरवानगी गैरहजर आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. याकारणे दाखवा नोटीसला संबंधित अधिकाऱ्याने आठ दिवसांतही उत्तर दिले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या विभागाचा आढावा देत असताना कृषी सहायक गावात येत नसल्याची ओरड करण्यात आली. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नागभीड तालुका सरसकट दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, असा ठराव यावेळी घेण्यात आला. पं.स.चे कृषी अधिकारी नितीन ऊईके आणि यू.जी. नैताम यांनीही आपल्या विभागाची माहिती यावेळी दिली.
लघुपाटबंधारे विभागाचा आढावा उपअभियंता पी.एस. सुखदेवे यांनी सभेत केला. नागभीड तालुक्यात २९४ मामा तलाव असून या तलावांची सिंचन क्षमता ५९४ हेक्टर आहे. तालुक्यात बिकली, मौशी, तेलीमेंढा, उश्राळमेंढा येथे लघुपाट बंधारे योजना असल्याची माहिती सुखदेवे यांनी यावेळी दिली. यावेळी सर्व मामा तालवाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना खासदार नेते यांनी दिला.
मांगरूड येथील मामा तलावाच्या सांडव्याची उंची वाढविल्यावर तेथे चांगलीच समस्या निर्माण झाली आहे. यावर या सभेत चांगलेच मंथन करण्यात आले. घोडाझरी नहराची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. या नहराच्या दुरुस्तीसाठी निधीची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आढावा सभेत महिला बालविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभागासह विविध विभागाचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केला. या सभेस तहसीलदार, सभापती प्रा.डॉ. रेखा जगनाडे, उपसभापती मंदा पेंदाम, जि.प. सदस्या लीना पेंदाम, संजय गजपुरे, होमेदव मेश्राम, पं.स. सदस्य दिवाकर कामडी, अभय हांडेकर, ज्योत्सना वारजूकर, जहांगीर कुरेकर यांची यावेळी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)