‘त्या’ कामगारांचे बेमुदत उपोषण सुरूच
By Admin | Updated: February 19, 2015 00:45 IST2015-02-19T00:45:33+5:302015-02-19T00:45:33+5:30
येथून काही अंतरावर असणाऱ्या मूल येथील राजुरी स्टील अॅण्ड अलॉय लिमिटेडच्या कामगारांनी कंपनी व प्रशासनाविरूद्ध अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली.

‘त्या’ कामगारांचे बेमुदत उपोषण सुरूच
चंद्रपूर : येथून काही अंतरावर असणाऱ्या मूल येथील राजुरी स्टील अॅण्ड अलॉय लिमिटेडच्या कामगारांनी कंपनी व प्रशासनाविरूद्ध अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाचा बुधवारी तेरावा दिवस असून कामगारांचे शारीरिक वजन कमी होऊ लागले आहे. आतापर्यंत १९ कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कामगार विभागानेच या कंपनीतील ५५ कामगारांना बेरोजगार केले, असा आरोप विदर्भ प्रहार कामगार संघटनेने केला असून आंदोलनाच्या तेराव्या दिवशीही जिल्हा प्रशासन सुस्त असल्याने या कामगारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान, कामगारांनी आता पाणीत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील मूल येथील राजुरी स्टील अॅण्ड अलॉय लिमी. या कंपनी मालकाने शासनाला कोणतीही सूचना न देता अचानक कंपनी बंद केली. त्यामुळे येथील ५५ कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. विशेष म्हणजे, या कामगारांनी कंपनीत सुरू असलेला कामगार कायदा विरोधातील प्रकार उघडकीस आणला होता. काही महिन्यांपूर्वी कामगारांनी यासंदर्भात कामगार विभागाकडे एका संघटनेच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर हे प्रकरण चर्चेस आले. कामगारांचे हित जोपासत असल्याचे नाट्य करून कामगार विभागाने त््यावेळी ५५ कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन कंपनीत सुरू असलेला प्रकार नोंदवून घेतला. एवढेच नव्हे तर त्यावेळी कंपनीसोबत येथील राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेच्या एका कामगार नेत्याने कामगारांना न्याय मिळवून देण्याचे भरीव आश्वासन दिले. त्याचवेळी या कामगारांना १५ जून २०१४ पासून कामावर घेण्याचे आश्वासन कंपनीने दिले. यासोबतच कामगारांच्या मागण्या २५ जून २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र त्या पूर्ण केल्या नाही. (शहर प्रतिनिधी)