वृक्ष लागवडीच्या संकल्प पूर्तीमध्ये वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचा सिंहाचा वाटा
By Admin | Updated: August 29, 2016 01:20 IST2016-08-29T01:20:52+5:302016-08-29T01:20:52+5:30
२ कोटी वृक्ष लागवडीचा जो संकल्प आपण केला होता, त्या संकल्पपुर्तीसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे परिश्रम घेतले;

वृक्ष लागवडीच्या संकल्प पूर्तीमध्ये वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचा सिंहाचा वाटा
सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : सेवानिवृत्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चंद्रपूर : २ कोटी वृक्ष लागवडीचा जो संकल्प आपण केला होता, त्या संकल्पपुर्तीसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे परिश्रम घेतले; त्यामुळेच हा संकल्प आम्ही पूर्ण करू शकलो. या प्रक्रियेमध्ये वनकर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
रविवारी महसुल भवन चंद्रपूर येथे चंद्रपूर तालुका वनखाते सहकारी पतसंस्था मर्या. यांच्यावतीने सभेचे औचित्य साधुन आयोजित सेवानिवृत्तांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी मंचावर भाजपा नेते राजीव गोलीवार, चंद्रपूर तालुका वनखाते सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष संतोष अतकारे, उपाध्क्ष दिलीप आत्राम, सचिव योगेश धकाते व पतसंस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य लक्षात घेत सेवानिवृत्तांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत, ही भावना जपत चंद्रपूर तालुका वनखाते कर्मचारी सहकार पतसंस्थेने आपल्या सेवाकाळात वनविभागाची सेवा करणाऱ्या सेवानिवृत्तांचा जो सत्कार आयोजित केला, तो खरोखरच अभिनंदनीय आहे. अमेरीका जरी प्रगत देश असला तरीही आपल्या देशात समाधान जास्त आहे; कारण आपल्या देशात जिव्हाळा, आपुलकी ही भावना आहे, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन राजेश पिंपळकर यांनी केले. कार्यक्रमाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची व परिवार सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)
वनकर्मचाऱ्यांना मोटार सायकली देण्याचा विचार
वनविभाग कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहे. वाहन भत्त्यात वाढ करणे, २८० वाहने खरेदी करणे असे अनेक निर्णय घेतले असून येणाऱ्या काळात वनकर्मचाऱ्यांना मोटार सायकली देण्याचा सुध्दा शासनाचा विचार आहे. वनविभागाची कार्यालये आय.एस.ओ. प्रमाणित करण्याचा शासनाचा मानस आहे. पूर्वी दुर्लक्षित समजला जाणारा वनविभाग आता वरदान ठरला आहे. रोजगार देण्यामध्ये वनविभाग इतर विभागांच्याही पुढे जाईल, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.