वेतनवाढीसाठी कामगारांचे मनपासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:49+5:302021-02-05T07:43:49+5:30
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेतील कंत्राटी घंटागाडी कामगार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानादेखील आपले कर्तव्य बजावत आहेत; मात्र त्यांच्या अनेक ...

वेतनवाढीसाठी कामगारांचे मनपासमोर आंदोलन
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेतील कंत्राटी घंटागाडी कामगार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानादेखील आपले कर्तव्य बजावत आहेत; मात्र त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे कामगारांनी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपासमोर आंदोलन केले. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास ८ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला.
कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून कंत्राटी घंटागाडी कामगारांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. कोरोना योध्दा म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला; मात्र आता या काेरोना योध्दांवर महागाईच्या काळात तटपुंज्या वेतनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जानेवारी २०२१ पासून घंटागाडी कामगारांना चालू किमान वेतन देण्यात यावे, नवीन निविदा प्रक्रियेला वेळ लागत असेल तर घंटागाडी कामगारांना जानेवारी महिन्यांपासून किमान वेतन देण्यात द्यावे आदी मागण्यांसाठी यंग चांदा ब्रिगेडतर्फे पाठपुरावा सुरु आहे. याबाबत बैठकाही घेण्यात आल्या. मनपाने कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्यापही कुठलाही तोडगा काढण्यात आला नसल्याने यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेड आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, कंत्राटी कामगार शहर संघटक राहुल मोहुर्ले, शहर संघटिका विमल काटकर, आशा देशमुख, दुर्गा वैरागडे, वैशाली रामटेके, आनंद रणशूर, राम जंगम, डोमाजी डोंगरे, कांडवजी मून, प्रकाश जुमडे, होमकांत गोवर्धन, मनीषा झिलीवार, जया भोयर, मुकेश पिंपळकर आदी उपस्थित होते.