सावली तहसीलवर श्रमिक एल्गारचा मोर्चा
By Admin | Updated: April 26, 2015 01:47 IST2015-04-26T01:47:38+5:302015-04-26T01:47:38+5:30
तालुक्यातील निराधार योजनेतील व स्वस्त धान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी ....

सावली तहसीलवर श्रमिक एल्गारचा मोर्चा
सावली : तालुक्यातील निराधार योजनेतील व स्वस्त धान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सावली तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने अनुदान देण्यात यावे, निराधारांच्या अनुदानात वाढ करून दीड हजार रुपये प्रतिमाह देण्यात यावे, निराधार योजनेतील अटी शिथील करण्यात याव्या, अन्न सुरक्षा योजनेत गरजु कार्डधारकांचा समावेश करण्यात यावा, एपीएलधारकांना धान्य देण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालयापर्यंत अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अॅड. गोस्वामी म्हणाल्या, महागाईच्या काळात निराधाराचे पेंशन वाढले नाही, मात्र आमदार, खासदारांचे पेंशन वाढविण्यात आले. मालकापेक्षा सेवकांकडेच जास्त लक्ष असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली.
शिष्टमंडळाने तहसीलदार सौरंगपते यांच्यासोबत मागण्यासंदर्भात चर्चा केली. लाभार्थ्यांचे अनुदान येत्या पंधरा दिवसात देण्याचे मान्य करून पुढील अनुदान दरमहा देण्याचे मान्य करण्यात आले.
अन्न सुरक्षा व इतर तहसील स्तरावरील समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी तहसीेलदार यांनी दिले. मोर्चात विजय सिध्दावार, विजय कोरेवार, रामचंद्र हुलके, अनिल मडावी, भास्कर आभारे, संगिता गेडाम, किरण शेंडे, आनंद धारणे, घनश्याम आत्राम, राजू कंचावार,यात्रिका कुमरे सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)