रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून कार्य करा
By Admin | Updated: April 23, 2016 00:59 IST2016-04-23T00:59:03+5:302016-04-23T00:59:03+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही गरिबांसाठी असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्यात यावा.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून कार्य करा
सुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
बल्लारपूर: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही गरिबांसाठी असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्यात यावा. रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून कार्य करा, असे आवाहन पालकमंत्री ेसुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
‘ग्राम उदय से भारत उदय अभियान’ तथा राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत येथील ग्रामीण रुग्णालयात गुरूवारी आयोजित मोफत आरोग्य शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जेष्ठ भाजपा नेते चंदनसिंग चंदेल, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, हरीश शर्मा, डॉ. एस.एल.दुधे, डॉ. हरदास, अमोल वाघमारे, सुनिल भगत व तहसीलदार अहिरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आरोग्य शिबीर व टोकन पध्दतीचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय सेवा देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगून ना.मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांचे आरोग्य नेहमी उत्तम राहावे. कुणालाही रुग्णालयात येण्याची गरज भासू नये. सर्वांत जास्त निधी आरोग्य सेवेला देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. या अगोदर आपण या क्षेत्रात अनेक शिबिरे घेऊन नागरिकांना रुग्ण सेवेचा लाभ दिला आहे. बल्लारपूरचे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडले गेल्यामुळे भविष्यात या ठिकाणी उत्तम सेवा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी ८३५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगून ते म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी योजनेला अधिक गती देण्याची गरज आहे. प्रास्ताविक डॉ. दुधे यांनी केले. दुपारपर्यंत ३८४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीरास नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)