संवेदनशीलतेने काम करा

By Admin | Updated: September 15, 2015 03:14 IST2015-09-15T03:14:47+5:302015-09-15T03:14:47+5:30

मानवांचा आणि जंगली श्वापदांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात एखाद्याला अपघात झाला तर त्या

Work sensibly | संवेदनशीलतेने काम करा

संवेदनशीलतेने काम करा

सावली : मानवांचा आणि जंगली श्वापदांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात एखाद्याला अपघात झाला तर त्या इसमापर्यंत तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी वनविभागाने संवेदनशील असावे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते सावली येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
ते म्हणाले, एकीकडे जंगली श्वापदं आणि मानवांमध्ये संघर्ष वाढत आहे. कधी शेतांचे तर कधी जीवांचे नुकसान होत असते. त्यामुळे वनविभागाने सतर्क राहून आपली सेवा तात्काळ उपलब्ध करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य शोभा फडणवीस, गडचिरोलीचे आमदार देवराव होळी, सावली-ब्रह्मपुरी क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रमोद पिपरे, जि.प. सदस्य वैशाली कुकडे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, भाजपाचे तालुका अध्यक्ष देवराव मुद्दमवार, सावलीचे माजी सरपंच अतुल लेनगुरे, काँग्रेसचे नेते प्रकाश राईंचवार आदी मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलन व फीत कापून रितसर इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री या नात्याने त्यांनी नवनिर्मित सावली नगर पंचायतीच्या विकासाकरिता दोन कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच वाघाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना आठ लाख रुपयांची मदत, शिवाय रानडुकरामुळे झालेल्या नुकसानीची ३० दिवसात मदत देण्याचा कायदाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच सावली तालुक्यातील सर्व माजी मालगुजारी तलावाची दुरूस्ती व खोलीकरण करण्याचे आश्वासन दिले.
विधान परिषद सदस्य शोभा फडणवीस यांनी या जिल्ह्यात वनांवर आधारित उद्योगांची निर्मिती करण्याची मागणी केली. त्यावर लवकरच प्रक्रियेला सुरूवात करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. बांबू प्रकल्पाबाबत बोलताना आपल्याकडे उच्च दर्जाचा बांबू उपलब्ध नाही. मात्र दर्जेदार बांबु निर्माण करण्याचे प्रयोग सुरू असून लवकरच तो प्रकल्प अस्तित्वात येईल, असेही अभिवचन दिले. जिल्ह्यात बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन चंद्रपूर’ हा प्रयोग करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण केवळ बोलत नाही तर जे बोलतो ते करून दाखवितो. केवळ दहा महिन्यात सर्व काही शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी काही दिवसांपर्यंत वाट पाहावी, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी केले तर संचालन व आभार नासीर खान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी. राठोड, क्षेत्र सहायक बी.डी. चिकाटे, राजू कोडापे, विजय रामटेके यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Work sensibly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.