तलाव उपसण्याचे काम केवळ २५ टक्केच
By Admin | Updated: June 10, 2015 01:41 IST2015-06-10T01:41:59+5:302015-06-10T01:41:59+5:30
जलसंपदा खात्याच्या चंद्रपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर अंतर्गत सिंचाई शाखा राजोलीच्या अधिनस्त ...

तलाव उपसण्याचे काम केवळ २५ टक्केच
राजू गेडाम/अशोक येनुरकर मूल/राजोली
जलसंपदा खात्याच्या चंद्रपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर अंतर्गत सिंचाई शाखा राजोलीच्या अधिनस्त राजोली मामा तलाव व गोलाभूज तलावातील गाळ उपसण्याचे काम गेल्या दिड महिन्यापासून सुरू आहे. मात्र आतापर्यंत २५ टक्केच गाळ काढण्यात आला आहे. परिणामी शेतकऱ्यांत चिंता व्यक्त केली जात आहे. हा तलाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे मानले जाते.
नागपूर येथील अभियांत्रिकी विभागाच्या शाखेमार्फतीने या तलावातील गाळ उपसण्याचे काम करण्यात येत आहे. या कामावर कोणत्याही अधिकाऱ्याचे नियंत्रण किंवा देखरेख नसल्यामुळे कामात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत आहे. त्यामुळे गाळ काढण्याचे काम कासवगतीने सुरु आहे.
लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याने त्यापूर्वी या तलावाचे खोलीकरण होणे गरजेचे आहे. २५ हजार घनमिटर गाळ तलावातून काढायचा असून त्यासाठी अंदाजे एक करोड रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. परंतु आजपर्यंत फक्त सहा हजार घनमिटर गाळ उपसल्याची माहिती आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधीच्या उदासिन धोरणामुळे हे काम रेंगाळत असून पावसाळ्यापूर्वी तलावातील गाळ उपसने गरजेचे असल्याने अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.