जिल्हा परिषदेत पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या कामाला वेग
By Admin | Updated: October 14, 2015 01:27 IST2015-10-14T01:27:42+5:302015-10-14T01:27:42+5:30
पंचायत राज सेवार्थ प्रणाली सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती प्रणालीद्वारा जलदगतीने गोळा करण्याचे काम सुरू असून ....

जिल्हा परिषदेत पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या कामाला वेग
इंटरनेट समस्या : दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होणार
चंद्रपूर : पंचायत राज सेवार्थ प्रणाली सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती प्रणालीद्वारा जलदगतीने गोळा करण्याचे काम सुरू असून सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी वेतनाबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये. जिल्हा परिषद अंतर्गत दिवाळीच्या पूर्वी पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून नियमित वेतन करण्यात येईल, असे जि.प.चे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी संतोष बाहुले यांनी स्पष्ट केले.
नव्याने जिल्हा परिषदमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन पंचायत राज सेवार्थ प्रणालीद्वारे करण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत या प्रणालीचे अद्ययावत करण्याचे काम जलदगतीने चालू आहे. या प्रणालीमध्ये मागील महिन्याचा देयक क्रमांक हा नमूद केल्याशिवाय पुढील महिन्याचे वेतन देयक हे प्रणालीमध्ये स्वीकारल्या जात नाही. माहे आॅगस्टचे वेतन देयके प्रणालीद्वारे स्विकारून कोषागारात सादर करण्यात आलेले आहे. सुरमवार यांनी माध्यमाला चुकीची माहिती देऊन याद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता पंचायत राज सेवार्थ प्रणालीद्वारा होत असलेल्या चांगल्या पद्धतीला सहकार्य करावे. याशिवाय प्रकाशित वृत्तात आठ हजार कर्मचारी वेतनापासून वंचित असल्याबाबत सुरमवार यांच्याकडून चुकीची माहिती माध्यमाला देण्यात आली. मात्र चंद्रपूर जिल्हा परिषदेत सेवार्थ प्रणालीमध्ये भरण्यात आलेल्या मंजुर पदांची संख्या ३ हजार ८४९ एवढीच आहे. यापैकी ३ हजार १९९ पदे भरलेली आहे. तीन हजार ७३ कर्मचाऱ्यांच्या आॅगस्ट महिन्याच्या वेतनाची देयके कोषागाराकडे वेतनासाठी सादर करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांचा आॅगस्टपर्यंतचा पगार करण्यात येणार आहे.
सेवार्थ प्रणाली ही महाराष्ट्र शासनाद्वारे नुकतीच लागू करण्यात आली आहे. इतर प्रणालीमध्ये सुरुवातीला ज्या प्रकारच्या अडचणी उद्भवतात त्याचप्रमाणे या ही प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहे. अतिशय दुर्गम भाग असलेला जिवती वा इतर तालुक्यामध्ये नेट कनेक्टीव्हिटी नसल्यामुळे विहित वेळेत कर्मचाऱ्यांची वेतनासंबंधी माहिती प्रणालीमध्ये अंतर्भूत करण्यास अडचणी उद्भवत आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेतच करण्यासाठी दक्षता घेत असून वेतन वेळेत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही पदे अतिरिक्त ठरत असून त्यांच्या समायोजनाबाबत विभागीय आयुक्त तथा शासनस्तरावर नियमित पाठपुरावा सुरू आहे. अधिकची कार्यालय व कर्मचारी पदे निर्माण करण्यासाठी प्रस्ताव निर्गमित करण्यात आला आहे. यासाठी निश्चितच थोडा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही संतोष बाहुले यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत राज सेवार्थ प्रणालीद्वारा सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुठल्याही पंचायत राज सेवार्थ प्रणालीबाबतचा संभ्रम निर्माण करणाऱ्या अफवेला बळी न पडता जिल्हा परिषदेचा एक भाग म्हणून पंचायत राज सेवार्थ प्रणालीकरिता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी संतोष बाहुले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)