कोरपन्यात अत्यंत कमी काम : जिल्ह्यात ३३ लाख ९ हजार १७४ मनुष्य दिवस निर्मितचंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील ७८ हजार ३०९ कुटुंबाना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात ५ हजार ९१५ कुटुंबांना १०० दिवस रोजगार पुरविण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुका प्रथम स्थानावर असून या तालुक्यात १८ हजार ३७ कुटुंबांना व ३३ हजार ९८६ व्यक्तींना रोजगार प्राप्त करुन दिला आहे. जिल्ह्यात ३३ लाख ९ हजार १७४ दिवस निर्मित करण्यात आले आहेत. कोरपना तालुक्यात फक्त ७५ कुटुंबांना रोजगार उपलब्ध करुन दिला. त्यामुळे कोरपना तालुक्याने मनरेगा अंतर्गत नाममात्र रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे स्पष्ट झाले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात ७ लाख ६१ हजार २०६ मनुष्य दिवस निर्मित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ब्रह्मपुरी तालुका रोजगार उपलब्ध करून देण्यात जिल्ह्यात प्रथम स्थानी आहे. त्या खालोखाल नागभीड तालुक्यात ५ लाख ५० हजार ३३३ मनुष्य दिवस निर्मित झाले असून तो जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे. कोरपना तालुका रोजगार उपलब्ध करून देण्यात अत्यंत मागे असून येथे केवळ ४ हजार ३४३ मनुष्य दिवस निर्मिती झाल्याची नोंद आहे. तिसऱ्या स्थानी ३ लाख ५४ हजार ५५६ मनुष्य दिवस निर्माण करणारा सावली तालुका आहे. पाचव्यास्थानी चिमूर तालुका असून चिमूर तालुक्यात ३ लाख १५ हजार ७६७ मनुष्य दिवस निर्मित करण्यात आले आहेत. या तालुक्यात ३१ हजार ४८२ कुटुंबाची नावे नोंदणी असून ९० हजार ७१ व्यक्तीनी नोंद केली आहे. त्यामध्ये ३१ हजार २३८ जॉब कार्ड देण्यात आले आहेत.मराठवाड्यापेक्षा विदर्भात दुष्काळ त्या प्रमाणात नसला तरी सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. कापसाला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असल्याने धान कापणीपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना कामासाठी अनेक ठिकाणी स्थलांतर करावे लागते. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मनरेगाची कामे सुरु करण्यात आलेली आहेत. देशात अकुशल कामगारांना रोजगाराचा हक्क मोठ्या प्रमाणात देणारे महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे.जिल्ह्यातील शेतीचा हंगाम संपल्यानंतर मजुराच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगा योजना उपयुक्त ठरली आहे. योजनेच्या माध्यमातून अनेग गावात शेततळे, पांदन रस्ते, सिंचन विहिरी तयार करण्यात यश आले असून सोबतच मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी ही योजना महत्वाची ठरली आहे. मनरेगात केंद्र शासन १०० दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व १०० दिवस प्रति कुटुंब मजुराच्या मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते. यामध्ये शौचालय बांधकाम, मुरुम रस्ते, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, तलाव दुरुस्ती, बोडी खोलीकरण इत्यादी कामासह घरकुल, फळबाग लागवड आदी कामे ६०:४० च्या प्रमाणामध्ये करण्यात येत आहेत. या योजनेत ब्रह्मपुरी तालुक्याने जिल्ह्यामध्ये जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. (शहर प्रतिनिधी)
मनरेगाच्या कामात जिल्ह्यात ‘ब्रह्मपुरी’ अव्वल
By admin | Updated: February 25, 2016 00:50 IST