ब्रिटीशकालीन कृषी संशोधन केंद्राचे कार्य ठप्प

By Admin | Updated: June 24, 2016 01:37 IST2016-06-24T01:37:50+5:302016-06-24T01:37:50+5:30

पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सात लाख ५० हजार हेक्टर शेतजमीन भात पिकाकरिता उपलब्ध आहे.

The work of the British Agricultural Research Center was stalled | ब्रिटीशकालीन कृषी संशोधन केंद्राचे कार्य ठप्प

ब्रिटीशकालीन कृषी संशोधन केंद्राचे कार्य ठप्प

शास्त्रज्ज्ञांचा अभाव : केंद्रात २८ तर कृषी विज्ञान केंद्रात १३ पदे रिक्त
बाबुराव परसावार सिंदेवाही
पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सात लाख ५० हजार हेक्टर शेतजमीन भात पिकाकरिता उपलब्ध आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात प्रगती करावी, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही परिसरात गडमौशी येथे ब्रिटीश राजवटीत १९११ मध्ये भात संशोधन केंद्र सुरु करण्यात आले. मात्र रिक्त पदे आणि शास्त्रज्ञांअभावी या केंद्रातील संशोधनाचे कार्य ठप्प पडले आहे.
या संशोधन केंद्राकडे २०० हेक्टर शेतजमीन आहे. त्या काळी संशोधन केंद्रावर ऊसाची लागवड करण्यात येत होती. त्यापासून गुळ तयार करुन विकण्यात येत होते. नंतर हे भात संशोधन केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले. भात पिकाचे नवनवीन वाण तयार करुन शेतकरी बांधवाना ते उपलब्ध करुन देण्याचा या केंद्राचा उद्देश आहे. पूर्व विदर्भ विभागासाठी उपयुक्त नवीन धान जातीची निर्मिती, पिक पद्धतीचे संशोधन पीक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा विकास, सेंद्रीय व रासायनिक खताचे व्यवस्थापन, नवीन वाणाची किड प्रतीकारिता पडताळणे, उत्पन्न वाढीसाठी संशोधन, प्रमाणीत जातीच्या बियाण्याची पैदास निर्मिती करणे आदी कृषी संशोधन केंद्राचे कार्य आहे. येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये एकूण ३१ पदे मंजूर असून २८ पदे रिक्त आहेत. येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. दुर्गे यांची बदली अकोला येथे झाली असून येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. व्ही. शेंडे हे प्रभारी सहयोगी संशोधन संचालकाचे काम पाहत आहेत. या केंद्रामध्ये एक सहयोगी संशोधन संचालक, एक सहयोगी प्राध्यापक (वनस्पतीरोगशास्त्र), एक किटकशास्त्र, एक मृद व जलव्यवस्थापन, एक विस्तार शिक्षण, एक सहाय्यक प्राध्यापक (कृषीविद्या), दोन कृषी वनस्पतीशास्त्र, दोन मृद व कृषी रसायनशास्त्र, एक पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, एक मत्स्यशास्त्र, एक वरिष्ठ संशोधन, पाच कृषीसहाय्यक, एक शाखाधिकारी, दोन शाखा सहाय्यक, एक क्षेत्र सहाय्यक, एक वाहन चालक, एक वरिष्ठ यांत्रिक, एक कनिष्ठ यांत्रिक, दोन प्रयोगशाळा परिचर, एक परिचर अशी पदे मिळून एकूण २८ पदे रिक्त आहेत. कृषी शास्त्रज्ञ व कृषी तज्ज्ञ व तांत्रिक कर्मचारी संशोधन केंद्रात नसल्यामुळे येथील संशोधन निर्मितीचे कार्य मंदावले आहे. आतापर्यंत कृषी संशोधन केंद्राने ७५० पेक्षा जास्त भात (धान) वाणाचे जतन करुन ठेवले आहे तर भात संशोधन केंद्राने सिंदेवाही- ७५, सिंदेवाही-२००१, पीकेव्ही एचएमटी, पीकेव्ही मकरंद, पीकेव्ही खमंग, पीकेव्ही गणेश, टीएसएसआर- १२, सिंदेवाही ३५-४-१६-६३, साकोली-२२-३९-३१-३४, साकोली ६-७-८, पीकेव्ही किसान, एसवायई ४-३२, एसवायई-४-४३२, साकोली एसकेएल-९, एसकेएल-३०-३९-२४, वाणाचे संशोधन करुन असे उच्च प्रतीचे वाण विकसित करुन प्रसारित केले आहे. या केंद्रातील अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेले प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण वाढत आहे.
सध्या शास्त्रज्ञाअभावी कृषी संशोधनाचे काम ठप्प आहे. येथील भात संशोधन केंद्र बंद करुन भात संशोधन केंद्र कृषी संशोधन केंद्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. विदर्भातील एकमेव असलेल्या कृषी संशोधन केंद्रामध्ये नवनवनी संकरित भाताचे वाण तयार करुन ते शेतकऱ्यापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
या संशोधन केंद्रामध्ये जूने ट्रॅक्टर जीर्ण झाले असून या केंद्राकडे कार्यालयीन वाहन व वाहन चालक नाही. दहा वर्षापासून या केंद्रात कृषी शास्त्रज्ञ व तांत्रिक कर्मचारी नाही. त्यामुळे १२ शास्त्रज्ञाचे काम एकाच प्रभारी सहयोगी संशोधन संचालकाकडे सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दहा वर्षापासून रिक्त पदे भरण्यात आली नाहीत.

केंद्रात केवळ तीन कर्मचारी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सिंदेवाही येथे सन २००४ पासून कृषी विज्ञान केंद्र सुरु करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्षेत्र चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राद्वारे कृषी विभागातील कर्मचारी व शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्यक्षिके, क्षेत्रीय निरीक्षण चाचण्या, कार्यशाळा, कृषी दिन कृषी प्रदर्शन, कृषी मेळावा हा कृषी विज्ञान केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. सदर कृषी विज्ञान केंद्रामध्ये १६ पदे मंजूर असून १३ पदे रिक्त आहेत. सध्या या केंद्रावर एक कार्यक्रम समन्वयक, एक सहाय्यक प्राध्यापक, विषयतज्ज्ञ, दुग्धशास्त्रज्ञ, कृषी विद्याधर, किटकशास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रीक ही महत्वाची पदे तसेच एक सहाय्यक (कॅम्प्युटर), एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक व्यवस्थापक, एक कार्यालय अधीक्षक, एक स्टेनोग्राफर, दोन वाहन चालक मिळून एकूण १३ पदे रिक्त आहेत. या केंद्रात विषयतज्ज्ञ नसल्यामुळे सध्या कृषी विज्ञान केंद्राचे कामकाज प्रभावित झाले आहे. तसेच मानव विकास अंतर्गत फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत तज्ज्ञ अधिकारी नसल्यामुळे तीन वर्षापासून फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा बंद आहे. या प्रयोग शाळेची दोन वाहने सध्या कार्यालयासमोर धूळ खात पडून आहे. लाखो रुपये खर्च करुन उभारलेली कृषी विज्ञान केंद्राची भव्य इमारत सध्या शोभेची वास्तु ठरत आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने संशोधन केंद्राकडे लक्ष देवून रिक्त पदे त्वरित भरण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी सिंदेवाही तालुका विकास संघर्ष समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: The work of the British Agricultural Research Center was stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.