घाईगर्दीत आटोपले जात आहे काम
By Admin | Updated: February 23, 2016 00:42 IST2016-02-23T00:42:57+5:302016-02-23T00:42:57+5:30
मनपाच्या नवीन इमारतीचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी साडेपाच कोटींचा खर्च झाला असून...

घाईगर्दीत आटोपले जात आहे काम
नागरकर यांचा आरोप : इमारत बांधकाम ५.५० कोटी; अंतर्गत सजावट १० कोटींची
चंद्रपूर : मनपाच्या नवीन इमारतीचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी साडेपाच कोटींचा खर्च झाला असून अंतर्गत सजावटीसाठी (इंटेरियर) तब्बल दहा कोटींचा खर्च करण्यात येत आहे. यातील काही कामांना मंजुरीही नसल्याचा आरोप मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती नंदू नागरकर यांनी केला आहे. डिसक्वालीफाईड होण्याच्या भीतीपोटी एवढा खर्च करूनही काम घाईगर्दीत तांत्रिकदृष्टया व्यवस्थित केले जात नसल्याचेही नागरकर यांनी सांगितले.
गांधी चौकातील मनपाच्या नवीन इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. लवकरच या वास्तूचे उदघाटनही करण्यात येणार आहे. तसे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे. या इमारत बांधकामाला साडेपाच कोटींचा खर्च आला आहे. आता इंटेरियरचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, इमारतीच्या अंतर्गत सजावटीसाठी तब्बल दहा कोटींचा खर्च करण्यात येत आहे. प्रारंभी बाहेरच्या ईलीव्हेशनचे काम करण्यात आले. पहिले टेंडर देताना ते तीन टक्के कमी याप्रमाणे देण्यात आले. मात्र त्यानंतर दहा कोटींचे टेंडर त्याच कंत्राटदाराला १४ टक्के अधिक, याप्रमाणे देऊन निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप नंदू नागरकर यांनी केला. याशिवाय तब्बल दीड कोटींची कामे अतिरिक्त करण्यात आली आहे.