कृषी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
By Admin | Updated: July 13, 2017 00:45 IST2017-07-13T00:45:31+5:302017-07-13T00:45:31+5:30
आपल्या विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले.

कृषी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
मागण्याची पूर्तता करावी : शेतकऱ्यांची कामे प्रलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : आपल्या विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले. याची शासनाने दखल घेतली नसल्याने आता कृषी कर्मचाऱ्यांनी शेतीच्या हंगामात काम बंद आंदोलन सुरू केल्याने शासनासमोर पेच उभा ठाकला आहे.
कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा, आकृतीबंद तयार करताना संघटनेस विचारात घेण्यात यावे, कृषी सहाय्यकाचे पद्नाम कृषी अधिकारी करण्यात यावे, कृषी सहाय्यकामधून कृषी पर्यवेक्षकांची १०० टक्के पदोन्नतीने करण्यात यावी, पदोन्नती करताना असलेली परीक्षेची अट काढण्यात यावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्ष कालावधी हा शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा, आंतरविभागीय बदली बाबतचा प्रस्ताव मंत्रालयात स्तरावर दोन वर्षांपासून प्रलंबीत असून संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकाचे मनोधर्य खचत आहे आदी मागण्या संदर्भात मागील एक महिण्यापासून कृषी सहायकाचे आंदोलन सुरू आहे. या मागण्या संदर्भात शासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने कृषी सहाय्यकांनी मागील दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना कृषी सहायकांकडून मार्गदर्शन करण्यात येते तसेच काही योजनामधून बियाणाचे वाटप करण्यात यावे. काम बंद आंदोलनामुळे शेतकरीही अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.