हंसराज अहीर यांच्या शिवार संवादाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: May 30, 2017 00:34 IST2017-05-30T00:34:31+5:302017-05-30T00:34:31+5:30

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे.

Women's Spontaneous Response to Hansraj Ahir's Shiar Dialogue | हंसराज अहीर यांच्या शिवार संवादाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हंसराज अहीर यांच्या शिवार संवादाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दमपूर मोहदा : शाश्वत विकास व शेतीपूरक योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्थान
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे. शेतीचा शाश्वत विकास साधण्यासाठी कल्याणकारी व महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. त्याच माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रयत्न असल्याने शेतकऱ्यांनी हताश न होता या योजनांचा लाभ घेवून विकास करावा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
ना. अहीर जिवती तालुक्यातील दमपूर मोहदा या अतिदुर्गम व पहाडी गावातील शेतकऱ्यांशी शिवार संवाद कार्यक्रमात बोलत होते.
दुर्गम भागातील दमपूर मोहदा येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर शिवार संवादाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांशी वार्तालाप करणार असल्याची माहिती मिळताच या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी ना. अहीर यांच्या शेतकरी विषयक भूमिकेची तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. ना. अहीर यांनी दमपूर मोहदा या गावास शिवार संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर भेट देवून शेतकऱ्यांच्या विविधांगी समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
चंद्रपूर जिल्हा सिंचन समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कोट्यवधी रुपये या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांच्या माध्यमातून खर्ची घालण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना पारंपारीक शेतीबरोबरच पुरक व्यवसाय म्हणून भाजीपाला, मधुमक्षीका पालन, मत्स्य व्यवसाय व फलोत्पादनासारख्या पिकांचे उत्पादन घेण्याकरिता उद्युक्त केले जात आहे. काही तालुक्यांमध्ये शेतकरी या व्यवसायाकडे वळले असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली असल्याचे सांगत ना. अहीर यांनी दमपूर मोहदा येथे उपस्थित शेतकऱ्यांना पुरक व्यवसायाला स्वीकारण्याचे आवाहन केले.
त्यांच्या या संवाद भेटीदरम्यान राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपचे उपमहापौर अनिल फुलझेले, अरूण मस्की, जिवती तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, जि.प. च्या सभापती गोदावरी केंद्रे, जिवती पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, सुरेश केंद्रे, दत्ता राठोड, मनोहर कुळसंगे, अशोक सोनी व गावातील पुरूष व महिला शेतकरी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेतकऱ्यांची कर्जमाफी हा अंतिम उपाय नव्हे
ना. अहीर यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती देणे हा अंतिम उपाय नसून शेतकऱ्यांना बँका, पतसंस्था व सावकारी कर्ज घेण्यापासून कसे मुक्त करता येईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाचे धोरणात्मक प्रयत्न सुरू आहेत. गेल्या ५० वर्षांत शेती व शेतकऱ्यांच्या समृद्धीचे प्रयत्न न झाल्याने, सिंचनाबाबत नियोजनशून्यता व चुका झाल्याने आज शेतकरी आर्थिक अडचणी व कर्जबाजारीपणाला तोंड देत आहे. या चुकांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना नेमके आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीने समृद्ध करता येईल. केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून शेतीचा शाश्वत विकास व शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ध्यास घेतला असल्याने नजीकच्या काळात शेतकरी आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Women's Spontaneous Response to Hansraj Ahir's Shiar Dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.