अवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिलांचा एल्गार

By Admin | Updated: November 8, 2014 22:35 IST2014-11-08T22:35:38+5:302014-11-08T22:35:38+5:30

चिमूर येथील नेताजी वॉर्डात सुरू असलेले अवैध दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली आहे. याला स्थानिक पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारू विक्रेते हे रहदारीच्या

Women's ElGard against illegal liquor vendors | अवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिलांचा एल्गार

अवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिलांचा एल्गार

चिमूर : चिमूर येथील नेताजी वॉर्डात सुरू असलेले अवैध दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली आहे. याला स्थानिक पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारू विक्रेते हे रहदारीच्या मार्गावर व्यवसाय करीत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असून मद्यपी ग्राहकांच्या गैरवर्तणुकीमुळे जनसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य जनतेच्या हिताकरिता वॉर्डातील अवैध दारू विक्रीचा व्यवसाय त्वरित बंद करून या व्यवसायिकांची दादागिरी थांबवावी, अशा मागणीचे निवेदन नेताजी वॉर्डातील १६५ महिला व पुरुषांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात चिमूर येथील नेताजी वॉर्डात चार अवैध दारू विक्रेत्यांनी आपला व्यवसाय राजरोसपणे सुरू केला आहे. नेताजी वॉर्डातील सुभाषचंद्र बोसच्या पुतळ्यापासून तर राम मंदिरापर्यंत जाणारा रहदारी मार्ग हा नेहमीच मद्यपींनी भरलेला असतो.
या रस्त्यावर मद्यपी हे नशेमध्ये मनाला वाटेल तसे वागतात. महिला-मुलींना पाहून इशारे करून अश्लील शब्दात बोलतात. त्यामुळे सदर रस्त्याने महिलांना, शाळकरी मुलींना, सामान्य नागरिकांना स्वत:ला वाचविण्याकरिता बरीच कसरत करावी लागते.
१ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान पत्रकार संजय वरघने हे आपल्या परिवारासह नारायण गायधनी या नातेवाईकाकडे जात असताना त्यांना रहदारीच्या मार्गावर अनेक वाहने, मद्यपींची गर्दी दिसली. त्यांना येण्यास मार्ग मोकळा नसल्यामुळे त्यांनी सदरीला मद्यपींना आपली वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करावी अशी सुचना केली असता, अवैध दारू विक्रेता दागो वरखडे हा सदर पत्रकारास अश्लील शब्दात शिवीगाळ करून मारायला धावला. अवैध दारू विक्रेते सामान्य नागरिकांना धमकावितात. त्यामुळे नागरिक भयभीत झाला आहे. संजय वरघने यांनी झालेल्या पत्रकाराबाबत पोलिसात तक्रार केली आहे. मात्र पोलिसांनी थातुरमातूर कारवाई केली. तर उलट ज्यांनी तक्रार दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्रेत्यांची दादागिरी संपविण्याकरिता येथील अवैध दारूची दुकाने बंद करण्यात यावी या, मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहे पोलीस अधिक्षक काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women's ElGard against illegal liquor vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.