वेळवा येथील अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:41+5:302021-03-18T04:27:41+5:30
घोसरी : वेळव्यात गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू आहे. या दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी ...

वेळवा येथील अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार
घोसरी : वेळव्यात गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू आहे. या दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी शिवशाही युवा मंचच्या नेतृत्वात गावातील महिलांनी पुढाकार घेऊन मंगळवारी पोंभूर्णा उपपोलीस ठाण्यात धडक देऊन ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली.
गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू आहे. वेळवा गाव तालुक्यातील दारूचा मोठा अड्डा बनलेला असल्याचे बोलले जात आहे. तद्वतच येथे सकाळपासूनच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी तळिरामांची रांग लागत असते, एवढेच नाही तर जवळच्या आष्टा, चेक आष्टा, सोनापूर, चेक फुटाणा, मोहाळा या गावातील दारूशौकिनाचे आवागमन सुरू असून दारू विक्रेते अन्य गावांना दारू पुरवठा करत असतात. त्यामुळे गल्ली-मोहल्ल्यातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत आहे.
गावातील अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी शिवशाही युवा मंच आणि ग्रामसंघाच्यावतीने गावातील संपूर्ण बचत गटांचा ठराव मागविण्यात येऊन महिला बचतगटांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात आवाज उठवून शेकडो महिलांंनी शिवशाही युवा मंचच्या नेतृत्वात पोंभूर्णा उपपोलीस स्टेशनचे ठाणेदार जोशी यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली. सदर तक्रारीवर ठाणेदार काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण वेळवावासीय तसेच तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.