गॅस सिलिंडरच्या नावाखाली महिलांची फसवणूक
By Admin | Updated: April 25, 2015 01:25 IST2015-04-25T01:25:18+5:302015-04-25T01:25:18+5:30
मानव विकास कार्यालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करून ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनाची अनुदानावर ....

गॅस सिलिंडरच्या नावाखाली महिलांची फसवणूक
कोठारी : मानव विकास कार्यालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करून ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनाची अनुदानावर गॅस कनेक्शन पुरवठा करण्याची योजना आहे, अशी माहिती देत प्रती महिलांकडून ५०० ते १००० रुपये जमा करून भामटा फरार झाला. या फसवणूक प्रकरणी लाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळकृष्ण सयाम असे भामट्याचे नाव असल्याची माहिती आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत शासन ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन अनुदानावर देण्याची योजना असल्याचे बचत गटातील महिलांना भामट्याने सांगितले. यासाठी अनुसूचित जाती वर्गातील प्रती कनेक्शन १७०० रुपये व इतर मागास जातीतील वर्गातील लाभार्थ्यांसाठी सिलिंडरची किंमत २२०० रुपये आहे, असे सांगत प्रती महिलांकडून ५०० ते १००० रुपये भामट्याने गोळा केले. त्यानंतर सर्व कागदपत्राची मागणी केली.
त्यासाठी त्याने तोहोगाव, पाचगाव, आर्वी, वेजगाव, सरांडी, लाठी आदी गावातील महिलांशी संपर्क करून २०० महिलांकडून तीन लाखांच्यावर ऐवज जमा केला. हा प्रकार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडला. शासनाची योजना असल्याने महिलांनीही कोणतीही चौकशी न करता सरपणाची कटकट कायम मिटणार या उद्देशापोटी पैसे व कागदपत्रे भराभर जमा केली.
सिलिंडरचा कनेक्शन १५ दिवसात देण्याचे आश्वासन भामट्याने दिले. माात्र तीन महिने लोटूनही गॅस कनेक्शन घरापर्यंत पोहचले नाही. बाळकृष्ण सयाम याने दिलेले भ्रमणध्वनी क्रमांक बंद करून तो पसार झाला. अखेर सदर बाब तोहगावचे उपसरपंच फिरोज पठाण यांना महिलांनी सागितली.
याबाबत त्यांनी मानव विकास चंद्रपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली असता, अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगत बाळकृष्ण सयाम नावाचा कुणीही काम करीत नसल्याची माहिती मिळाली. या आधारे तोहोगाव परिसरातील महिलांनी लाठी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलीस भामट्याचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)