कुक्कुटपालनातून महिलांनी साधली उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:56+5:302021-07-21T04:19:56+5:30
प्रकाश काळे गोवरी : महिलांनी प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. महिला आता पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम ...

कुक्कुटपालनातून महिलांनी साधली उन्नती
प्रकाश काळे
गोवरी : महिलांनी प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. महिला आता पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. राजुरा तालुक्यातील गोवरी येथील पेरसापेन आदिवासी महिला बचत गटाने एक पाऊल पुढे टाकत कुक्कटपालनातून व्यवसाय करीत इतर महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
जिद्द, मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर व्यक्ती कोणताही व्यवसाय उभारू शकते. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे असून, राजुरा तालुक्यातील गोवरी येथील १३ महिलांनी मिळून पेरसापेन आदिवासी महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत विशेष केंद्रीय अर्थसाहाय्य निधीतून कुक्कटपालनासाठी गोवरी येथील पेरसापेन आदिवासी महिला बचत गटाला १० लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. या गटात १२ महिला सदस्य असून, त्या एकजुटीने हा कुक्कटपालनाचा व्यवसाय सांभाळत आहेत. आजघडीला १५०० कोंबड्या असून, सुसज्ज असे शेडचे बांधकामही करण्यात आले आहे. एकीकडे सुशिक्षित बेरोजगार रोजगारासाठी भटकंती करीत असताना जिद्द, मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर बचत गटाच्या महिलांनी पुढे येत कुक्कुटपालनातून महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण केला आहे. पेरसापेन आदिवासी महिला बचत गटाच्या अध्यक्षा उषा आत्राम, बारुला टेकाम, वर्षा आत्राम, छाया सोयाम, शोभा कोडापे, कौशल्या आत्राम, गीता आत्राम, सुनंदा आत्राम, गीता कोडापे, सुरेखा सोयाम, मैनाबाई कोडापे, कांताबाई टेकाम, बेबिबाई टेकाम या महिला या व्यवसायात परिश्रम घेत आहेत.
कोट
महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडविली आहे. महिला आत्मनिर्भर झाल्या तर समाजात नक्कीच नवे परिवर्तन घडू शकते. आम्ही सर्व महिलांनी मिळून पेरसापेन आदिवासी महिला बचत गटाच्या माध्यमातून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. यातून महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत.
-बारुला टेकाम
सचिव, पेरसापेन आदिवासी महिला बचत गट, गोवरी