महिला तक्रार निवारण कार्यक्रम
By Admin | Updated: September 2, 2014 23:39 IST2014-09-02T23:39:34+5:302014-09-02T23:39:34+5:30
राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण मंचाच्यावतीने महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकाराची जाणिव करुन देण्यासाठी शनिवारी तक्रार निवारण कार्यक्रमाचे

महिला तक्रार निवारण कार्यक्रम
चंद्रपूर : राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण मंचाच्यावतीने महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकाराची जाणिव करुन देण्यासाठी शनिवारी तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या सशक्तीकरणातून स्त्री-पुरुष समानतेविषयी जागृती निर्माण करण्याचा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश होता.
महाविद्यालयात महिला तक्रार निवारण मंच २०१२ साली स्थापन करण्यात आला. या मंचाकडे आजपर्यंत एकही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. महाविद्यालयात महिलांप्रती कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, हे यावरुन स्पष्ट होते, असे प्राचार्य डॉ. किर्तीवर्धन दीक्षित म्हणाले.
तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष डॉ. आरती दिक्षित यांनी तक्रार निवारण मंचाचे महत्व सांगितले. या मंचामुळे विद्यार्थी, शिक्षक व अन्य कर्मचारी यांच्यात सौहार्दपूर्ण नाते निर्माण होण्यास मदत मिळते. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली हस्तक यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यांनी कुठल्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाविरुद्ध तक्रार कशी करावी, कुठे करावी याबद्दल मार्गदर्शन केले. तक्रार ही त्रास देणाऱ्या विरुद्ध असते, पुरुष किंवा मुलाविरुद्ध नसते, हे ही त्यांनी सांगितले.
चंद्रपुरातील दंतवधेक आणि हर्षल ग्रामीण विकास बहुसंस्थेच्या डॉ. रश्मी पिपरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बहुसंख्येने मुली शिकत असल्याबद्दल आपल्या भाषणातून समाधान व्यक्त केले. महिला तक्रार निवारण मंचाच्या माध्यमातून महाविद्यालयातील मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. तसेच पालक व अन्य कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण होते, असे ते यावेळी म्हणाले.
महिला तक्रार निवारण मंचाचे सदस्य प्रा. के.के. सिन्हा, प्रा. एन. बी. वरभे, प्रा. डी. बी. मेश्राम, प्रा. अल्का सावलीकर, प्रा. संगीता वर्मा आणि वैशाली पिंपळशेंडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.या कार्यक्रमाला विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)