अवैध दारुविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या
By Admin | Updated: November 13, 2015 01:01 IST2015-11-13T01:01:46+5:302015-11-13T01:01:46+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून संपूर्ण दारुबंदी झाली असताना तळोधी (बुु.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर वाहत आहे.

अवैध दारुविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या
तळोधीत ठिय्या आंदोलन : पोलीस चौकीवर काढला मोर्चा
तळोधी (बा.) : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून संपूर्ण दारुबंदी झाली असताना तळोधी (बुु.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर वाहत आहे. याकडे तळोधी (बा.) पोलीस चौकीचे दुर्लक्ष होत असल्याने खुलेआम दारू विकल्या जात आहे. याविरुद्ध सोमवारी गावातील महिलांनी तळोधीतील पोलीस चौकीसमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. चार दिवसांत अवैध दारू विक्री बंद न झाल्यास आंदोलन तिव्र करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
ठिय्या आंदोलनानंंतर १० नोव्हेंबरला तळोधी ग्रामपंचायतीपासून पोलीस चौकीवर महिला व पुरुषांचा मोर्चाही काढण्यात आला. अवैध दारु व सट्टापट्टी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या आवारात सभा पार पडली. या सभेत महिलांनी अवैधरित्या छुप्या मार्गाने पैसा घेवून पोलीस दारू विक्रेत्यांना सोडून देत असल्याचा आरोप केला.
यावेळी दारुबंदीसाठी वॉर्डा- वॉर्डात महिला व पुरुषांच्या समित्या स्थापन करा, त्यांना पोलिसांकडून संरक्षण दिल्या जाईल, असे आश्वासन नागभीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवाने व तळोधी (बा,) पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक मस्के यांनी दिले. यावेळी तळोधी (बा.)चे सरपंच राजू रामटेके, उपसरपंच भास्करराव लोनबले, तंटामुक्त अध्यक्ष उपेंद्र चिललवार, वसंत बडवाईक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व पत्रकार मंडळी बहुसंंख्येने हजर होते. (वार्ताहर)