महिला, शेतकरी अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू राहणार
By Admin | Updated: February 7, 2015 23:21 IST2015-02-07T23:21:26+5:302015-02-07T23:21:26+5:30
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांना डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाला आकार देण्यात येईल. सोबतच महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी

महिला, शेतकरी अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू राहणार
चंद्रपूर : महिला, शेतकरी आणि बेरोजगारांना डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाला आकार देण्यात येईल. सोबतच महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी चंद्रपूर येथे व्यापार संकुल उभारण्याचा मानस राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित तेजस्विनी स्वयंसहाय्यता संगम-२०१५ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, सभापती सरीता कुळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, मीना खनके, सुजाता भगत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मोहिते व सानप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तेजस्विनी संगम फक्त प्रदर्शन नसून महिलांचे आर्थिक आंदोलन आहे, असे नमुद करुन पालकमंत्री म्हणाले, महिलांच्या या आंदोलनाला सरकारचा सकारात्मक पाठिंबा नेहमीच राहील. बचत गटांच्या महिलांनी आपल्या जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण उत्पादन तयार करून मोठ्या बाजारपेठेत पाठविण्याचे प्रयत्न करावे यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मदत करण्यास तयार आहे. आपला जिल्हा बचत गट उत्पादनात राज्यात पहिला यावा अशा रितीने प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. संचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रिती हिरोळकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)