आवाळपूरच्या महिलेला नांदा येथे घरकूल
By Admin | Updated: March 19, 2017 00:32 IST2017-03-19T00:32:28+5:302017-03-19T00:32:28+5:30
शासनाच्या रमाई आवास योजनेतंर्गत सन २०१६-१७ करिता कोरपना तालुक्यात एकुण ३७ ग्रामपंचायतीसाठी ५२ घरकुल मंजूर करण्यात आले.

आवाळपूरच्या महिलेला नांदा येथे घरकूल
नांदा ग्रामपंचायतीचा प्रताप : विधवांना डावलून सधन लोकांना दिली घरे
चंद्रपूर : शासनाच्या रमाई आवास योजनेतंर्गत सन २०१६-१७ करिता कोरपना तालुक्यात एकुण ३७ ग्रामपंचायतीसाठी ५२ घरकुल मंजूर करण्यात आले. त्यापैकी एकट्या नांदा ग्रामपंचायतीला १२ घरकुलांची मंजुरी मिळाली. मात्र नांदा ग्रामपंचायतीने विधवा व गरजूंना डावलून चक्क आवाळपूरच्या रहिवासी असलेल्या महिलेला घरकूल मंजूर केल्याचे उघडकीस आले आहे.
या ग्रामपंचायतीने गरजूंना बगल देत सधन लोकांना घरे दिल्याने विधवा महिलांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष वृत्त असे की, नांदा ग्रामपंचायतीने १६ डिसेंबर २०१६ ला रमाई घरकुल योजनेकरिता लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आमसभा घेतली. सभेत एकुण ५४ नागरिकांनी लाभार्थी म्हणून निवड व्हावी यासाठी नावे दिली. १२ घरकुलासाठी ५४ जणांची यादी ग्रामपंचायत नांदाने तयार केली. शासनाकडे १२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसाठी पाठवित असताना गरजुंना प्राधान्य देणे महत्वाचे होते. मात्र तसे न करता स्वमर्जीतल्या लोकांना घरकुलाची मंजुरी देऊन खऱ्या गरजू लाभार्थ्यांना डावलण्यात आले.
सभेचे अध्यक्ष व सचिवांनी ठराव घेण्याच्या पुर्वी ग्रामसभेत विधवा, निराधार, अल्प उत्पन्न असणारे व्यक्ती व वयोवृद्ध लाभार्थी निवडण्यासंबंधात माहिती देणे आवश्यक होते. परंतु तसे न करता सरळसरळ यादी बनविण्यात आली. प्राधान्यक्रम न ठरवता स्थळ पंचनामा न करता यादी जशीच्या तशी पंचायत समिती कोरपना येथे पाठविण्यात आली. सभेचे अध्यक्ष व सचिवांनी मर्जीतल्या लोकांना प्राधान्य दिल्याने जिल्हा स्तरावरून सुरूवातीचे अनुक्रमांकावर नाव असलेल्या नागरिकांची रमाई घरकुल योजनेसाठी निवड करण्यात आली.
चौकशी करून प्राधान्यक्रम न ठरवता यादी पाठवल्याने अनेक गरजू, विधवा व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांचे नुकसान झाले. याबाबत ताराबाई डोंगरे, मंगला चेन्नुरवार, अचम्मा मंगल या महिलांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे.
यात सर्वाधिक गंभीर बाब अशी की जिल्हा स्तरावरून मंजूर यादीत चंद्रकला किसन सोनटक्के या महिलेची निवड करण्यात आली आहे. वास्तविक सदर महिला आवाळपूर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने त्याठिकाणी घर, रेशनकार्ड व मतदान कार्ड आहे. चंद्रकला सोनटक्के ही महिला नांदा ग्रामपंचायतीची रहिवाशी नसतानाही तिला रमाई घरकुल योजनेची लाभार्थी बनविण्यात आले आहे. याची आता चौकशी होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
रमाई घरकूल योजनेचे लाभार्थी निवडण्यासाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेचे अध्यक्ष उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले होते. ते स्थानिक असल्यामुळे त्यांनी कोणाकडे पक्के घर आहे, कोणती महिला विधवा आहे, झोपडीत राहते की पक्क्या घरात राहते, उत्पन्न किती, स्थानिक रहिवासी आहेत का? अशा सर्व बाबींची शहानिशा करून लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम बनवायला पाहिजे होता. मात्र तसे न झाल्याने ताराबाई डोंगरे, मंगला चेन्नुरवार, अचम्मा मंगल या विधवा महिलांचे नुकसान झाले आहे. स्थळ पंचनामा करून लाभार्थी निवडण्यात यावे.
- अभय मुनोत, सदस्य, ग्रा.पं. नांदा.