दारूबंदीच्या मुद्यावरून महिलेला बेदम मारहाण
By Admin | Updated: March 8, 2015 00:34 IST2015-03-08T00:34:58+5:302015-03-08T00:34:58+5:30
जिल्हा दारूबंदी समितीची अध्यक्ष असूनही गावातील अवैध दारू विक्री का बंद करीत नाही, असा सवाल करून गावातील तिघांनी एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना...

दारूबंदीच्या मुद्यावरून महिलेला बेदम मारहाण
भद्रावती : जिल्हा दारूबंदी समितीची अध्यक्ष असूनही गावातील अवैध दारू विक्री का बंद करीत नाही, असा सवाल करून गावातील तिघांनी एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चालबर्डी या गावी शुक्रवारी धुळवडीच्या दिवशी घडली. या मारहाणीत सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या चंद्रपुरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तालुक्यातील चालबर्डी येथील रहिवासी तथा जिल्हा दारूबंदी समितीच्या स्थानिक अध्यक्ष संध्या प्रदीप राऊत (२८) शुक्रवारी सकाळी ११ वाजता शौैचावरून घरी परत येत असताना तीन इसमांनी त्यांना रस्त्यात अडविले. तु दारूबंदी समितीची अध्यक्ष आहे तर गावातील अवैध दारूविक्री का बंद करीत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून त्यांच्यात चांगलाच वाद झाला. त्यानंतर संध्या राऊत घरी परत आल्या. दरम्यान, गावातील रामकिसन महादेव भडमाडे (२६), शालिक उद्धव शेरकुरे (४२) आणि महादेव मडमाडे (४६) हे तिघेही तिच्या घरी गेले. तेथे त्यांनी याच मुद्यावरून वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की, या तिघांनी संध्या राऊत यांच्यावर लोखंडी सळाखीने हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना लगेच जिल्हा रुग्णालयात हालविण्यात आले.
संध्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध भांदवि ४५२, ३२४ अन्वेय गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)
पारोमिता गोस्वामी यांची चालबर्डीला भेट
या घटनेची दखल घेत जिल्हा दारूबंदी समितीच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांनी गावाला भेट दिली. घटनेबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ठाणेदारांची भेटसुद्धा घेऊन घटनेची माहिती घेतली. ही घटना अतिशय गंभीर असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
मोहबाळ्यात ‘अण्णा’ची दहशत
तालुक्यातील मोहबाळा या गावातील तंटामुक्ती समितीचा माजी अध्यक्ष अण्णा राजु स्वामी हा गेल्या अनेक वर्षांपासून या गावात अवैधरित्या दारूची विक्री करीत आहे. तो हा व्यवसाय आपल्या दहशतीने चालवितो. त्याच्या या दहशतीची माहिती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली. यावरुन त्याला अटक करण्यात आली.