वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:38+5:302021-04-02T04:28:38+5:30
मूल (चंद्रपूर) : मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना कक्ष क्रमांक ...

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
मूल (चंद्रपूर) : मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना कक्ष क्रमांक ११५ मध्ये बुधवारी सकाळी ११ वाजता दरम्यान घडली.
कल्पना नामदेव वाढई (५४) असे मृत महिलेचे नाव आहे.
मूल तालुक्यातील आगडी येथील कल्पना नामदेव वाढई आणि तिची आई कौशल्या मांदाळे या गावाला लागून असलेल्या जंगल परिसरात मोहफुले वेचायला गेल्या होत्या. मोहफुले उशिरापर्यंत पडत असल्याने आई कौशल्या मांदाळे या जेवण करायला घरी गेल्या. दरम्यान, उशीर होऊनही कल्पना घरी परत न आल्याने नातू उमेश वाढई याने जंगलात जाऊन कल्पनाचा शोध घेतला. मात्र, ती दिसली नाही. त्यानंतर तो गावामध्ये येऊन गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शोधाशोध केली असता कक्ष क्रमांक ११५ मध्ये कल्पना मृत अवस्थेत आढळून आली.
कल्पनाच्या अंगावरील जखमांमुळे सदर प्रकार वाघाच्या हल्ल्यामुळे झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. चिचपल्लीचे वन परिक्षेत्राधिकारी वैभव राजूरकर, मूलचे क्षेत्र सहायक प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले व वनविभागाची चमू यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.