प्रसुतीदरम्यान महिलेचा रुग्णालयात मृत्यू
By Admin | Updated: April 23, 2015 01:01 IST2015-04-23T01:01:14+5:302015-04-23T01:01:14+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती असलेल्या महिलेच्या प्रसुती दरम्यान मृत्यू झाला.

प्रसुतीदरम्यान महिलेचा रुग्णालयात मृत्यू
चिमूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती असलेल्या महिलेच्या प्रसुती दरम्यान मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव विद्या शिलवंत पाटील पळसगाव (२३ वर्ष) आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.
विद्या पाटील ही विवाहित महिला १९ एप्रिलला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती झाली होती. सोनोग्राफीनुसार तिची प्रसुती २४ एप्रिलला होणार, असे निदान करण्यात आले होते. परंतु भरती झाल्यापासून १८ तासांनी तिला वेदना सुरू झाल्या. काही वेळानंतर तिची प्रसुती झाली. बाळ सुखरूप जन्माला आले. मात्र महिलेला खुप वेदना आणि रक्तस्त्राव सुरू झाला. विद्याच्या पतीने तिची ही गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांना रेफर देण्यास सांगितले. मात्र रेफर न दिल्यामुळे ती रक्तस्त्रवामुळे अशक्त झाली व प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर विद्याच्या प्रेताचे शवविच्छेदन न करता डॉक्टरांनी नातेवाईकांना प्रेत सुर्पूद केले. पंचनामाही करण्यात आला नाही. प्रेत रुग्णालयाच्या वाहनाने तिच्या गावी पोहचविण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले असले तरी उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक बाबीमध्ये कमतरता दिसून येत आहे. पाहिजे त्या प्रमाणात सेवा मिळत नाही. यंत्र सामुग्री, तज्ञ डॉक्टर नाही. त्यामुळे आता हे उपजिल्हा रुग्णालय सुविधांअभावी जीवघेणे ठरत आहे. लोकप्रतिनिधींनी या अवस्थकडे लक्ष देवून दुरूस्त्या घडवाव्या आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)