लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव (चंद्रपूर) : गावाच्या शेजारी रिंगण करून बंदिस्त ठेवलेल्या कळपावर लांडग्यांनी हल्ला चढवून तब्बल ३० मेंढ्यांचा बळी घेतला, तर दहा मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना मूल तालुक्यातील गडीसुर्ला चुरुड तुकूम येथे सोमवारी (दि. ११) पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. सर्व मेंढ्या नितेश मैसू येग्गावार यांच्या मालकीच्या असून या हल्ल्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरातील मेंढपाळांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
गडीसुर्ला चुरुड तुकूम येथील नितेश येग्गावार यांचा मेंढपाळ हा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यांच्याकडे १५० पेक्षा अधिक मेंढ्या आहेत. नेहमीप्रमाणे गावाशेजारी रिंगण करून कळप बंदिस्त ठेवला होता. मध्यरात्री लांडग्यांनी रिंगणात शिरून हल्ला केला. बंदिस्त असल्याने मेंढ्यांना बाहेर पळता आले नाही. सकाळी पाहणीदरम्यान ३० मेंढ्या मृत, तर १० रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या. रिंगणात व बाहेरील पावलांचे निरीक्षण केल्यानंतर हा हल्ला लांडग्यांनी केल्याची त्यांना खात्री पटली. ही माहिती त्यांनी पोलिस पाटील माला वाळके यांना दिली. त्यांनी पोलिस ठाणे व वन विभागाला कळविल्यानंतर काही वेळातच पथक घटनास्थळी दाखल झाले. लांडग्यांनीच हल्ला केल्याचे वन विभाग व पोलिसांच्या पथकानेही मान्य केले आहे. यावेळी माजी सरपंच संजय येनुरकर, वनरक्षक प्रियांका लांडगे, पोलिस पाटील वाळके, ग्रामपंचायत सदस्य प्रीतम आकुलवार आदी उपस्थित होते.
चराईच्या क्षेत्रावर अतिक्रमणमूल तालुक्यातील गडीसुर्ला व चुरूड तुकूम परिसरात शेकडो हेक्टर क्षेत्र चराईसाठी राखीव अशी कागदपत्रांत नोंद आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी या क्षेत्रात अतिक्रमण केले. त्यामुळे पारंपरिक मेंढपाळांना चराईसाठी शिवारात सध्या कुरणच शिल्लक नाही. त्यामुळे मेंढपाळांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
भरपाई देण्याची मागणी
- गडीसुर्ला येथे १०० पेक्षा अधिक कुरमार कुटुंब पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करतात. पावसाळ्यात पिके उभी असल्याने मेंढपाळांची चराईसाठी अडचण होते.
- मग ते गावालगत रिंगण करून त्यात मेंढ्यांचा कळप ठेवतात. हीच संधी साधून लांडग्यांनी ३० मेंढ्यांचा बळी घेतला. प्रशासनाने चराईसाठी जागा द्यावी व येग्गावार कुटुंबाला भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.