विना 'कटकट' वीज कनेक्शन

By Admin | Updated: May 15, 2014 01:05 IST2014-05-15T01:05:45+5:302014-05-15T01:05:45+5:30

वीज मागणी अर्ज करताना ग्राहकांना होणारा मनस्ताप रोखण्याबरोबरच भ्रष्टाचारास लगाम लावण्यासाठी महावितरण कंपनीने आता प्रत्येक ग्राहकास वीज मागणी अर्ज ऑनलाईन करण्याची सक्ती केली आहे

Without 'Crack' power connection | विना 'कटकट' वीज कनेक्शन

विना 'कटकट' वीज कनेक्शन

ऑनलाईन अर्जाची सक्ती : दररोज कळणार स्टेटस

खडसंगी : वीज मागणी अर्ज करताना ग्राहकांना होणारा मनस्ताप रोखण्याबरोबरच भ्रष्टाचारास लगाम लावण्यासाठी महावितरण कंपनीने आता प्रत्येक ग्राहकास वीज मागणी अर्ज ऑनलाईन करण्याची सक्ती केली आहे. प्रत्येक शाखा कार्यालयात यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ठराविक मुदतीत ग्राहकांना वीज कनेक्शन देण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना आता वेळेत वीज कनेक्शन विना कटकटीने मिळणार आहे.
घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि कृषीपंप अशा कोणत्याही वर्गातील विद्युत कनेक्शनसाठी ग्राहकांना मोठय़ा संकटातून जावे लागते. शाखा कार्यालयात अधिकारी जागेवर नसणे, कागदपत्रांची त्रृटी काढून कनेक्शन देण्यास टाळाटाळ करणे तथा अर्थपुर्ण व्यवहाराशिवाय कनेक्शन न देणे अशा विविध तक्रारीमुळे ग्राहक व वीज कंपनीचा संघर्ष वाढला होता. त्यामुळे वीज नको म्हणण्याची पाळी ग्राहकांवर आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने अर्ज घेतला तरी सर्वेक्षण करण्यास विलंब लावणे, कोटेशन देण्यास टाळाटाळकरण्याचे प्रकारघडत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी वीज कंपनीने आता ऑनलाईन अर्ज करणे सक्तीचे केले आहे. यासाठी प्रत्येक शाखा कार्यालयात संगणक बसविण्यात आला आहे. या शाखा कार्यालयात येणारा प्रत्येक अर्ज अधिकार्‍यांनी ऑनलाईन भरणे बंधनकारक केले आहे. अर्ज ऑनलाईन भरताच संबंधित ग्राहकांना एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे. या क्रमांकावर संबंधित ग्राहकांच्या अर्जाची दैनंदिन स्थिती (स्टेटस) काय आहे, याची माहिती संगणकावर ग्राहकाला समजणार आहे. सोबतच शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालय, कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता आणि मुख्य अभियंत्यापर्यंत सर्वांना ही माहिती त्यांच्या कार्यालयातील संगणकावर मिळणार आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांना आपल्या कार्यक्षेत्रातील किती प्रकरणे केव्हापासून प्रलंबित आहेत, याची माहिती मिळणार आहे.
ग्राहकांना विद्युत खांब, ट्रान्सफार्मर अशा जादा पायाभुत सुविधा लागत नसल्यास एका महिन्यात कनेक्शन देण्याची सोय केली आहे. तर अशा सुविधांची आवश्यकता असल्यास अशा ग्राहकांना तीन महिन्यात कनेक्शन देणे बंधनकारक केले आहे. यामध्ये संबंधित अधिकार्‍यांनी हयगय केल्यास त्या अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. या महावितरण कंपनीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमुळे नविन ग्राहकांना विना कटकट वीज कनेक्शन मिळण्यास मदत होणार असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Without 'Crack' power connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.