लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या २३३ शिक्षकांनी रजा प्रवास सवलतीच्या नावावर १७ लाख ८४ हजार ७२१ रूपयांची उचल केल्याचा ठपका सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाने केलेल्या अंकेक्षणातून उघडकीस आले आहे. त्यामुळेजिल्हा परिषद शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना चार वषातून एकदा कुटुंबासह महाराष्ट्र दर्शन घेण्याची योजना सुरू आहे. या योजनेतंर्गत राजुरा तालुक्यातील २३३ शिक्षकांनी लाभ घेतला. गणपती पुळे येथे जाऊन आल्याचा पुरावा म्हणून त्यांनी दान दिल्याची पावती जोडल्याचे सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने केलेल्या अंकेक्षणातून उघडकीस आले. गणपती पुळे येथे दान दिल्यानंतर संगणीकृत पावती दिली जाते. मात्र ट्रॅव्हल एजन्सीतर्फे सर्व मॅनेज करून स्वतः पावत्या छापून रत्नागिरी येथील गणपती पुळे येथे गेल्याचा व दान केल्याचा पुरावा म्हणून सादर केल्याची माहिती २०१९ - २०२० मध्ये उघड झाली आहे. अंकेक्षणातून गुरूजींची ही चलाखी लक्षात आल्याने जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी चौकशी करण्याचे आदेश वित्त आणि लेखा विभागाला दिले आहेत. दरम्यान, पंचायत समितीला अजुन अहवाल मिळाला नाही, अशी माहिती संवर्ग विकास अधिकारीओमप्रकाश रामावत यांनी दिली.
सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाने केलेल्या अंकेक्षणातून राजुरा पंचायत समिती अंतर्गत २३३ शिक्षकांनी एलटीसीच्या नावावर रक्कमेची उचल केली. या सर्व शिक्षकांना नोटीसा बजावून ही रक्कम तातडीने वसूल केली जाईल. त्यानंतर नियमानुसार कारवाई करू. - राहुल कडिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर
सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षण राज्य यांच्याकडे जि. प. चेही अंकेक्षन केले जाते. अंकेक्षणानुसार रजा प्रवास सवलतीच्या नावावर शिक्षकांनी रकमेची उचल केली. अहवाल मिळाल्यानंतर तातडीने कारवाई सुरू होईल. - अशोक मातकर, लेखा व वित्त अधिकारी, जि. प. चंद्रपूर