वादळी पावसाने अनेकांची बत्तीगूल
By Admin | Updated: March 29, 2016 02:29 IST2016-03-29T02:29:56+5:302016-03-29T02:29:56+5:30
जिल्ह्यात अवकाळी पावसाची गडद छाया अद्यापही दूर झाली नसून या पावसाचा कहर सुरूच आहे. रविवारी जिल्ह्यात अनेक

वादळी पावसाने अनेकांची बत्तीगूल
चंद्रपूर : जिल्ह्यात अवकाळी पावसाची गडद छाया अद्यापही दूर झाली नसून या पावसाचा कहर सुरूच आहे. रविवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शहरातील बत्ती गूल झाल्याने काही ठिकाणच्या नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रबी पीक भिजले होते. त्यानंतर परत दोन दिवसानी मुसळधार पाऊस झाला होता. यात अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली तर काही ठिकाणी रस्त्यावर झाले कोसळली होती.
पंधरा ते वीस दिवसांच्या विश्रातीनंतर रविवारी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. या वादळी पावसाचा फटका जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित संगीत रजनी कार्यक्रमालाही बसला.
रविवारी सायंकाळी जीवती, तळोधी, घुग्घुस, सावली, मूल, ब्रह्मपुरी, गेवरा, चंद्रपूर, नागभीड, चिमूर आदी शहरात विजांच्या कडकडासह वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी खांबावर झाडे कोसळली. त्यामुळे रात्रभर वीज पुरवठा बंद होता. या वादळाचा सर्वाधिक फटका वीज कंपनीला बसला असून लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती आणि ती खरी ठरली. (स्थानिक प्रतिनिधी)
‘संगीत रजनी’ अर्ध्यावर गुंडाळला
४जिल्हा पोलीस दलातर्फे चंद्रपुरात रविवारी संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलीस ग्राऊंडवर आयोजित कार्यक्रमाला शेकडो प्रेक्षकांची उपस्थिती होती. मात्र रात्री ९ वाजताच्या सुमारास वादळ सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे साडेनऊ वाजताच्या सुमारास संगीत रजनी कार्यक्रम अर्ध्यावर गुंडाळण्याची पाळी पोलीस दलावर आली. पावसाने हजेरी लावल्याने कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मोठी तारांबळ उडाली.
जिवती तालुका रात्रभर अंधारात
४वादळी पावसाने अनेक ठिकाणी वीज खांबावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे जिवती शहरासह अनेक गावातील वीज पुरवठा रात्रभर खंडीत झाला होता. घुग्घुस, गेवरा, नागभीड येथेही वीज पुरवठा बंद होता.