वादळी पावसाने तासभर झोडपले
By Admin | Updated: May 14, 2017 00:29 IST2017-05-14T00:29:02+5:302017-05-14T00:29:02+5:30
तप्त उन्हामुळे नागरिक हैराण असतानाच शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी पावसाने चंद्रपुरात कहर केला.

वादळी पावसाने तासभर झोडपले
नागरिकांचे नुकसान : झाडे उन्मळून पडली, तारा तुटल्या, वीजपुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तप्त उन्हामुळे नागरिक हैराण असतानाच शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी पावसाने चंद्रपुरात कहर केला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी नागरिकांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. नागरिकांच्या घरातील बागबगिचे उद्ध्वस्त झाले. वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा तब्बल तीन तास बंद होता. याशिवाय काही घरांचीही पडझड झाल्याची माहिती आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चंद्रपुरात उन्हाचा पारा चढायला सुरुवात झाली. एप्रिल महिन्यातच पारा ४५ अंशापार गेला. त्यानंतर मे महिन्यात तर चक्क ४६.४ तापमानाची नोंदही करण्यात आली. अंगाची लाही लाही होत असतानाच आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक वातावरण बदलले. ढग दाटून आले आणि वादळी पावसाला सुरुवात झाली. उन्हाळा सुरु असल्यामुळे अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल, याची जाणीव नागरिकांना नव्हती. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक व्यावसायिक आपल्या दुकानाच्या समोर फुटपाथवर साहित्य लावून ठेवतात. वादळी पावसामुळे अनेक व्यावसायिकांचे हे साहित्य उडून गेले. शहरातील अनेक वॉर्डात, मुख्य रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. यात काही वाहनांच्या काचा फुटल्या. मात्र सुदैवाने जिवितहानी झाली नाही. याशिवाय अनेक ठिकाणच्या विद्युत तारा, केबल ताराही तुटल्या. त्यामुळे चंद्रपूर शहरातील वीज पुरवठा खंडित झाला.
जवळजवळ तासभर वादळी पावसाने थैमान मांडले होते. यात शहरातील काही घरेही पडल्याची माहिती आहे. अनेक विद्युत तारांवर झाडे पडली असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करताना वीज कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. दुपारी ४ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा सायंकाळी ७ वाजता पूर्ववत झाला.
जिल्ह्यात पाऊस
चंद्रपूरसह मूल, सिंदेवाही, बल्लारपूर तालुक्यासह अन्य काही गावातही शनिवारी दुपारी वादळी पाऊस झाला. या ठिकाणीही अनेक झाडे उन्मळून पडली. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे एका व्यक्तीच्या घराचे टिनाचे छप्पर उडाले. घरातील अन्नधान्य भिजून नुकसान झाले.
नाल्या तुंबल्या
चंद्रपुरात आज शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे मनपाचे नाले सफाईचे पितळ उघडे पडले. या पावसाने नाल्या तुंबून नाल्यातील घाण रस्यावर आली. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. केवळ एका तासाच्या पावसातची ही स्थिती बघायला मिळाली. पुढे पावसाळ्यात काय स्थिती असेल, याचा विचार न केलेलाच बरा !
बालिकेचा मृत्यू
लालपेठ परिसरातही जोरदार वादळ आले. या दरम्यान सुदामा बिंद यांच्या घराजवळ खेळत असलेल्या काजल गुप्ता (९) रा. लालपेठ हिच्या अंगावरच झाड कोसळले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. नऊ वर्षीय काजलचा असा दुर्दैवी अंत झाल्याने लालपेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.