वादळी पावसाचे तांडव
By Admin | Updated: March 18, 2017 00:34 IST2017-03-18T00:34:09+5:302017-03-18T00:34:09+5:30
कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची जोरदार मागणी अधिवेशनात सुरू आहे.

वादळी पावसाचे तांडव
शेकडो घरांची छप्परे उडाली पिकांचे अपरिमित नुकसान, घरांचीही पडझड
आशिष देरकर कोरपना
कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची जोरदार मागणी अधिवेशनात सुरू आहे. अशातच निसर्गराजा शेतकऱ्यांवर कोपला असून जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीटीचे तांडव सुरू आहे. पाच दिवसांत तब्बल दोनदा अवकाळी वादळी पावसाने तांडव करून शेतकऱ्यांना पुरते हतबल करून सोडले आहे. गुरुवारी सायंकाळी ६-७ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात व इतर ठिकाणी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: रडायला भाग पाडले. या वदाळाच्या तडाख्यात अनेकांच्या घरांची छप्परे उडाली तर हजारो हेक्टरवरील पीक जमीनदोस्त झाले आहे.
गुरूवारच्या वादळी पावसाने कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, हिरापूर, सांगोडा, अंतरगाव, गाडेगाव, विरुर, भोयगाव, भारोसा, कवठाळा, तळोदी, बाखर्डी, निमनी, लखमापूर, उपरवाही, पिंपळगाव, खिर्डी, इंजापूर व परिसरातील गहू, ज्वारी, हरभरा, कापूस, मिरची इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अल्पावधीतच हाती येणारे पीक क्षणात अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडून जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
प्रातिनिधीक स्वरूपात सांगायचे झाल्यास तालुक्यातील बिबी येथील शेतकरी महादेव थेरे या तरुण शेतकऱ्याचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरचा गुरांचा गोठा पडून छोट्या वासराचा मृत्यू झाला व काही जनावरे जखमी झाली. शेतात नुकतेच हरभरा पीक कापून ढीग करून ठेवले होते. मात्र सकाळी जाऊन बघितले असता, ढिगारा नष्ट होऊन हरभरा शेतात अस्ताव्यस्त पसरून दूरवर उडाल्याचे दिसून आले.
तळोधी येथील शेतकरी विठ्ठल गोहोकार, अरविंद गोहोकार व योगेश गोखरे यांच्याही घरांचे छत, जनावरांचा गोठा, साठवून ठेवलेला कापूस, जनावरांचा चारा, घरगुती धान्याचे वादळी पावसाने नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील टीनाचे छत उडाल्याने घरात पाणी पडून अनेक वस्तू भिजल्या. बाखर्डी येथील शेतकरी हरिभाऊ जेनेकर यांचा घरावर ठेवून असलेला कापूस वादळी पावसाने अक्षरश: उडवून नेला. दारात जागा अपुरी असल्यामुळे त्यांनी घरावर अंदाजे चार ते पाच क्विंटल कापूस ठेवला होता. मात्र वादळाच्या तडाख्यात घरावरील कापूस उडाला व तो भिजल्याने बेकामी झाला आहे. या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची हिच अवस्था दिसून आली.
चांगले पीक घेता यावे म्हणून बँकांचे कर्ज घेतले. जुने कर्ज फेडून नवीन कर्ज घेत नव्याने शेती कसण्याची वेळ आली असताना अवकाळी पावसाने सर्वस्व हिरावले. बँकांचे जुने कर्ज फेडण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, हा माझ्यासमोर बिकट प्रश्न आहे.
- महादेव थेरे, शेतकरी, बिबी.
अचानकच्या वादळी पावसाने धावाधाव झाली. अनेक शेतकऱ्यांचे गहू व हरभरा या पिकांचे शेतात ढिगारे होते. मात्र वादळी पावसामुळे ढिगारे झाकण्यासाठी शेतात पोहोचता आले नाही. यात हातचे पीक बिनकामी झाले आहे.
- हरीदास जेनेकर,
शेतकरी, बाखर्डी