‘त्या’ इंग्रजकालीन वास्तूचे जतन होणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:44+5:302021-07-20T04:20:44+5:30
देशाच्या स्वातंत्र्यानंतर इंग्रज व स्थानिकांमध्ये रंगला होता क्रिकेट सामना रवी रणदिवे ब्रम्हपुरी : इंग्रज राजवटीत शहरातील तहसील कार्यालयाची ...

‘त्या’ इंग्रजकालीन वास्तूचे जतन होणार काय?
देशाच्या स्वातंत्र्यानंतर इंग्रज व स्थानिकांमध्ये रंगला होता क्रिकेट सामना
रवी रणदिवे
ब्रम्हपुरी : इंग्रज राजवटीत शहरातील तहसील कार्यालयाची इमारत निर्माण करण्यात आली होती. ही इमारत मोडकळीस आल्याने नवी प्रशासकीय इमारत तयार करण्यात येत आहे. काही महिन्यानंतर नव्या इमारतीत स्थानांतर होईल. मात्र, जुनी इमारत पाडण्यात येईल की जुन्या इंग्रजकालीन इमारतीचे पुरातत्त्व विभाग जतन करणार, असा प्रश्न ब्रम्हपुरीकरांना पडला आहे.
इंग्रज राजवटीत ब्रम्हपुरी हे महत्त्वाचे ठिकाण असल्याचे जुने जाणकार सांगतात. सन १९१० मध्ये शहराच्या मध्य भागात तहसील कार्यालयाची प्रशस्त इमारत निर्माण करण्यात आली असल्याचा उल्लेख इमारतीवर अधोरेखित आहे. या इमारतीला ५२ दरवाजे व ५२ खिडक्या असल्याने संपूर्ण जिल्ह्यात ही इमारत नावारूपास आली आहे. या इमारतीला तब्बल ११० वर्ष पूर्ण झाली आहेत. ही इमारत मोडकळीस आल्याने नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम या इमारतीच्या मागील भागात करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात कार्यालय नव्या इमारतीत स्थानांतरण होणार आहे. त्यामुळे ही इमारत खाली करण्यात येईल. नव्या इमारतीत स्थानांतरण झाल्यानंतर या इमारतीचे जतन पुरातन वास्तू म्हणून पुरातत्व विभागाकडून करण्यात येईल काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. या इमारतीच्या समोरील भागात प्रवेशद्वाराजवळ जयस्तंभ उभारण्यात आला असून त्याचे बांधकाम १५ ऑगस्ट १९४७ ला करण्यात आल्याचे अधोरेखित आहे. इमारतीच्या समोर प्रशस्त पटांगण आहे. नव्या इमारतीत ये-जा करण्यासाठी सोईचे व्हावे म्हणून ही इमारत पाडण्यात येणार काय, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
कोट
येथील तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटिशकालीन आहे. त्या काळात ही इमारत आकर्षणाचे केंद्र होते. दूरवरून जनता ही इमारत पाहण्याकरिता येत होती. देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा हजारो पणत्या बनवून संपूर्ण इमारतीवर रोशणाई करण्यात आली होती. ब्रिटिश अधिकारी आणि नागरिकांमध्ये समोरील पटांगणात क्रिकेटचा सामना यावेळी खेळण्यात आला होता. ही ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे या इमारतीचे जतन करण्यात यावे.
- डॉ. प्रा. मोहन कापगते,
इतिहास विभाग प्रमुख
ने. हि.महाविद्यालय, ब्रम्हपुरी.