मूल-गडचिरोली रेल्वे मार्ग सुरू होईल का?
By Admin | Updated: February 26, 2015 00:48 IST2015-02-26T00:48:15+5:302015-02-26T00:48:15+5:30
गेल्या कित्येक वर्षापासून गडचिरोली येथे रेल्वे मार्ग सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. मात्र वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत असल्याने...

मूल-गडचिरोली रेल्वे मार्ग सुरू होईल का?
सावली : गेल्या कित्येक वर्षापासून गडचिरोली येथे रेल्वे मार्ग सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. मात्र वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत असल्याने कमी अडचणींचा असलेला गडचिरोली-मूल रेल्वे मार्ग सुरू करण्याची अशी मागणी परिसरातील नागरिकांनी दोन्ही खासदारांकडे केली आहे.
चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर व चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली - मूल रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केल्यास हा प्रश्न तत्काळ निकाली लागू शकतो, असा आशावाद परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
गडचिरोली ते वडसा रेल्वे मार्गाचे अंतर ५३ कि.मी. असून अनेक लहान मोठ्या नद्यांचा अडथळा आणि जंगलव्याप्त परिसरातील नक्षलवाद्यांची भीती आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाला गडचिरोली - वडसा रेल्वे मार्ग सुरू करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्या तुलनेत गडचिरोली जिल्हा मुख्यालयी रेल्वेची गरज आणि मागणी लक्षात घेता मूल येथून अवघ्या ४० कि.मी. अंतरावर असलेल्या गडचिरोलीसाठी रेल्वे मार्ग सुरू केल्यास हा मार्ग सर्वांसाठी सोईस्कर ठरणार आहे.
या रेल्वे मार्गामुळे गडचिरोली ते मुंबई असा थेट प्रवास करणे गडचिरोलीकरांना व सावली तालुक्यातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. या मार्गासाठी कमी प्रमाणात वनकायद्याच्या अडसर आणि वैनगंगा व उमा या दोनच नद्यांवर पुल बांधण्याची आवश्यकता भासणार आहे. शिवाय प्रवाशांसाठीही हा मार्ग कमी त्रासाचा होणार आहे.
यासाठी दोन्ही खासदारांनी पुढाकार घेण्याची मागणी सावली परिसरातील नागरिकांची आहे. (तालुका प्रतिनिधी)