‘मोदी मंत्रा’चा प्रभाव राज्य उत्पादन शुल्क अधिकारीवर पडणार काय?

By Admin | Updated: September 8, 2014 01:12 IST2014-09-08T01:12:18+5:302014-09-08T01:12:18+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशातील जनतेला संबोधित करताना ‘भ्रष्टाचार बर्दाश नही करेंगे’

Will the Modi Mantra affect the state excise duty officer? | ‘मोदी मंत्रा’चा प्रभाव राज्य उत्पादन शुल्क अधिकारीवर पडणार काय?

‘मोदी मंत्रा’चा प्रभाव राज्य उत्पादन शुल्क अधिकारीवर पडणार काय?

राजुरा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशातील जनतेला संबोधित करताना ‘भ्रष्टाचार बर्दाश नही करेंगे’ असा मंत्र देतानाच भ्रष्टाचारासारख्या गैरप्रकाराला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. परंतु चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांवर त्याचा कोणताच परिणाम व प्रभाव पडला नाही. आजही जिल्ह्यातील परवानाधारक देशी दारू विक्री परवानाधारकांकडून सर्रास बेभाव विक्री सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात देशी दारू दुकानधारकांकडून देशी दारूची १८० मि.ली. च्या बाटलीची सर्व करासहीत निर्धारित किंमत ३३ रुपये असताना ती ४५ रुपयांत सर्रास विकण्यात येत आहे. चंद्रपूर व राजुरा येथील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयापासून अवघ्या २०० मिटर अंतरावर दुकान आहे. मात्र तेथेही ४५ रुपयांत देशी दारूच्या बाटलीची विक्री केली जात आहे. दुकानात दर फलक नाही. बसण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे मद्यपीला उभ्यानेच मद्य प्राशन करावे लागत आहे. शासनाने देशी व विदेशी बारला परवानगी दिली असल्याचे म्हटले जाते. विदेशी दारूची विक्री करणाऱ्या बारमध्ये ग्राहकांसाठी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु देशी परवानाधारकांनी कोणत्याच सोयी उपलब्ध न करता निर्धारित रकमेपेक्षा प्रती बाटली १२ रुपये जादा घेतले जात आहेत. त्याची पावतीसुद्धा दिली जात नाही. त्यामुळे अधिकची रक्कम शासनाच्या तिजोरीत जात आहे की परवानाधारकांच्या खिशात? याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
देशात भाजपाचे सरकार स्थापन होताच, १५ आॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना मोदी मंत्र दिला. त्यात त्यांनी ‘भ्रष्टाचार बर्दाश नही करेंगे’ असे ठामपणे सांगत देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. परंतु त्याचा प्रभाव राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी आणि मागासलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर अद्यापही पडला नाही. त्यामुळे देशी दारू पिणाऱ्या गोरगरीब जनतेची सर्रास लुट परवानाधारक देशी दारू दुकानधारकांकडून केली जात आहे. याला तातडीने पायबंद घालावा, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
काही परवानाधारकांकडून गावोगावी एजन्ट नेमण्यात आले आहेत. त्या एजंटांच्या मार्फत अवैध मार्गाने तिच दारूची बाटली ७५ रुपयांत विकली जात आहे. अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवायचे असते. परंतु पोलिसही या अवैध विक्रीवर आळा घालण्याचे टाळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे गावात सहज दारू मिळत असल्यामुळे पिणाऱ्याची संख्या वाढून गावात तंटे भांडणाचे प्रमाणात वाढ झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Will the Modi Mantra affect the state excise duty officer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.