अपूर्ण बंधारा पूर्ण होणार का ?
By Admin | Updated: January 5, 2017 00:54 IST2017-01-05T00:54:14+5:302017-01-05T00:54:14+5:30
पाण्याअभावी शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल,

अपूर्ण बंधारा पूर्ण होणार का ?
लाखोंचा खर्च पाण्यात : सिंचनाअभावी शेती लागली सुकायला
प्रकाश काळे गोवरी
पाण्याअभावी शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, या उद्दात हेतुने शासनाने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालत असलेल्या नाल्यावर बंधारा बांधकाम केले. परंतु, बंधारा बांधकामाचे काम अर्ध्यावरच थांबल्याने शेतकऱ्यांचे हरित क्रांतीचे स्वप्न भंगले आहे. आज ना, उद्या बंधारा बांधकाम होईल, या आशेवर शेतकरी आहे. मात्र अनेक वर्षांचा कालावधी लोटूनही बंधाऱ्याचे बांधकाम झालेले नाही.
राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत मोठा नाला वाहतो. या नाल्यावर गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधकाम सुरू केले. बंधाऱ्याचे बांधकाम सुरू झाल्याने नाल्याच्या काठावरील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार होती. शेतीला पाणी मिळणार म्हणून शेतकऱ्यांना हरितक्रांतीचे स्वप्न पल्लवित होते. परंतु, ‘शासनाचे काम, वर्षानुवर्षे थांब’ अशीच अवस्था गोवरी येथील बंधाऱ्याची झाली. बंधाऱ्याचे बांधकाम उशीरा सुरू झाले. त्यामुळे बंधाऱ्याचा आर्थिक बजेट वाढत गेला. कंत्राटदाराने बंधाऱ्याचा बजेट वाढल्याचे कारण पुढे करीत बंधाऱ्याचे काम अर्ध्यावरच सोडले. याला तब्बल दहा-बारा वर्षाचा कालावधी उलटला आहे. परंतु, बंधारा अजूनही अखेरच्या घटका मोजत आहे. अर्धवट बंधारा बांधकामामुळे शासनाच्या लाखो रुपयाचा चुराडा झाला आहे.
शासनाचा बंधारा बांधकामाचा उद्देश चांगला होता. परंतु प्रशासनाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांंनी याकडे दुर्लक्ष केल्याने लाखो रुपये खर्च करून बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही अडविता आला नाही. उलट बंधारा अर्धवट असल्याने प्रत्यक्षात किती बांधकाम केले, हे कळायला मार्ग नाही. बांधकामात अनेकांनी आपले खिसे गरम करून घेतले. परंतु बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. सध्या शेतीला पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याअभावी शेतपिके सुकायला लागली आहेत. मात्र आज बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी भाऊराव रणदिवे, भाऊजी लोहे, भास्कर लोहे, अनिल रणदिवे, देवराव वासाडे, अमित रणदिवे, गणपत लांडे, शंकर लांडे, मोरेश्वर रणदिवे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
तीन आमदार बदलले
मात्र बंधारा अपूर्णच
गोवरी नाल्यावर बंधारा बांधकाम सुरू झाल्यानंतर राजुरा विधानसभा क्षेत्राचे तीन आमदार बदलले. अनेकदा शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे बंधारा बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने दहा-बारा वर्षानंतर बंधारा अर्धवट अवस्थेत तसाच अखेरचा घटका मोजत आहे.
कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी व परिसरातील शेतकरी, नागरिकांना पाणी मिळावे यासाठी बंधारा बांधण्यात आला. परंतु शासनाचे लाखो रुपये खर्चूनही बंधारा पूर्ण झाला नाही. त्यामुळे शेतपिके पाण्याअभावी सुकायला लागली असून बंधारा बांधकाम पूर्ण करण्यात यावे.
- नागोबा लांडे
अध्यक्ष बंधारा समिती गोवरी