‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्या बाबांनाही न्याय मिळेल का ?
By Admin | Updated: June 18, 2017 00:32 IST2017-06-18T00:32:38+5:302017-06-18T00:32:38+5:30
अलिकडे ‘डे’ नावाच्या संस्कृतीने मानवी जीवनात चांगलाच शिरकाव केलेला आहे. फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या मायावी ...

‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्या बाबांनाही न्याय मिळेल का ?
वतन लोणे । लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : अलिकडे ‘डे’ नावाच्या संस्कृतीने मानवी जीवनात चांगलाच शिरकाव केलेला आहे. फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या मायावी दुनियेत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जगभरातील तरूण आज कुठल्या ना कुठल्या ‘डे’ची वाट पाहत असतात. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरात ‘फादर्स डे’चे आयोजन करण्यात येते.
वडिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरूवात अमेरिकेत करण्यात आली. लहानपणापासून मुलांना कायम धाकात व बंधनात ठेवणारा पिता, प्रपंचाची जबाबदारी समर्थपणे पेलत असताना जबाबदारीच्या ओझाने असेल किंवा समाजाच्या दडपणामुळे, रडताना कधीच दिसत नाही.
कुटुंबप्रमुख, कर्ता पुरूष, कुटुंबाचा आधार अशी अनेक बिरूदे सन्मानाने मिरवणारा हा बाप, मुलगी सासरी जाताना मात्र डोळ्यांत पाणी आणतो, रडतो.
तेव्हा तो खूप अगतिक वाटतो. मनात चिंता असते, मात्र तरीही ओठावर सतत हसू ठेवणारा हा वधूपिता काळजाच्या तुकड्याला अनोळखी कुटुंबाच्या हवाली करताना अगतिक न होईल तरच नवलच!
आयुष्यभर कुटुंबासाठीच झटणाऱ्या पित्याला सलाम करण्याचा ‘फादर्स डे’ हा अनोखा दिवस. आईचे प्रेम आणि वडिलांची माया मिळाल्याखेरीज मुलांचे भवितव्य उज्ज्वल होत नाही. मात्र, सध्याच्या काळात पती-पत्नींचे घटस्फोटांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. अशा प्रकरणात मुलाची जबाबदारी व त्याचा ताबा हे कायदेशीर प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. कौटुंबिक न्यायालयेही आईकडेच मुलांचा ताबा देतात. वयाच्या ७ व्या वर्षापर्यंत मुलाचा आईकडे ताबा असतो. नंतर पुन्हा मुलगा म्हणेल त्याच्याकडे ताबा देण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, सतत आईच्या संपर्कात असल्याने बऱ्याचशा घटनांमध्ये नंतरही मुलगा आईकडेच राहणे पसंत करतो.
सतत वडिलांच्या विरोधातच ऐकत असल्यामुळे वडिलांबद्दलची नकारात्मक मानसिकता तयार होत जाते. त्यामुळे उभ्या आयुष्यात वडील व मुलगा यांच्यातला दुरावा कमी होत नाही. पयार्याने या नातेसंबंधावर अत्यंत वाईट परिणाम होतात. अविश्वसनीय वाटत असलेली ही परिस्थिती आज बरेच वडील जगत आहेत.
भारतीय परिवार बचाव संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्राद्वारे या बाबीची कल्पना देण्यात आली आहे. मुलांचा ताबा न मिळालेल्या वडिलांना मुलांचा पूर्ण खर्च सोसावा लागतो. मात्र, या बदल्यात वडिलांना मुलासोबत महिन्यातून एकदाच ३० मिनिटे ते १ तास भेटता येते. ही भेट सार्वजनिक ठिकाणीच घेतली पाहिजे, असेही बंधन आहे.
त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने अशा प्रकरणांत निर्णय देताना वडिलांच्याही भावनांचा विचार करावा, अशी विनंती संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे. नाहीतर भारतीय समाज व्यवस्थेत वडिलांंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
घटस्फोटानंतर मुलाचा ताबा आईकडे गेल्यानंतर वडिलांना मुलाला भेटणेही कठीण होऊन बसते. मुलाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. एकप्रकारच्या दडपण व नैराश्याखाली वडील वावरू लागतो. तो कोणाला काही सांगूही शकत नाही व मोकळेपणाने रडूही शकत नाही. वडिलांनाही भावना असतात, हे लक्षात घेतल्यास समोपचाराने असे प्रश्न सुटू शकतात.
- डॉ. नंदकिशोर मैंदळकर,
जिल्हाध्यक्ष, भारतीय परिवार
बचाव संघटना, चंद्रपूर.