वृद्ध मातासाठी प्रशासन ‘श्रावणबाळ’ ठरेल काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:36 IST2017-07-13T00:36:35+5:302017-07-13T00:36:35+5:30
बापु, आमचा लई महिने झाले पगार आला नाही गा... जरा सांगनं त्या साईबाले, असे उद्गार काढून चक्क गालाला हात लावत मायेचा स्पर्श करणाऱ्या सत्तरीतल्या १५ ते २० वृध्द महिला आपल्या व्यथा मांडत होत्या.

वृद्ध मातासाठी प्रशासन ‘श्रावणबाळ’ ठरेल काय ?
कुणीही लक्ष देईना ! : मानधनासाठी वृद्ध मातांची तहसीलमध्ये पायपीट.
राजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : बापु, आमचा लई महिने झाले पगार आला नाही गा... जरा सांगनं त्या साईबाले, असे उद्गार काढून चक्क गालाला हात लावत मायेचा स्पर्श करणाऱ्या सत्तरीतल्या १५ ते २० वृध्द महिला आपल्या व्यथा मांडत होत्या. त्यांच्या मायेतही एक प्रकारची अगतिकता दिसत होती. शासनाकडून मिळणाऱ्या मानधनासाठी त्यांची ही केविलवानी धडपड सुरू होती.
हा प्रसंग क्रांतीभूमीतील गजबजलेल्या नेहरू चौकातील जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या जनसंपर्क कार्यालयात बघायला मिळाला आणि निराधार वृध्द महिलांना खरेच शासनाचा आधार मिळाला का, असा प्रश्न निर्माण झाला.
तालुक्याच्या टोकावर असलेल्या बामनगाव येथील वृद्ध मातांचे वृद्धापकाळ निवृत्ती मानधन काही महिन्यापासुन रखडले आहे. या वृद्ध मातांनी अनेकदा तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. शासकीय कार्यालयच ते, दप्तर दिरंगाई ठासून भरलेली. या वृद्ध मातांना त्याचीच प्रचिती आली. त्यामुळे आपले मानधन किंवा रोजची होत असलेली कुचंबना याची कैफीयत मांगण्यासाठी या वृद्धमाता गजानन बुटके यांच्याकडे पोहचल्या. बुटके यांनी महिलांची अवस्था व शासकीय लेटलतीफशाहीमुळे या वृद्ध मातांना होणाऱ्या त्रासाची कैफीयत या मातासह तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार विनायक मंगर यांच्यापुढे मांडली.
या २९ महिलांपैकी काही महिलांना मागील चार-पाच महिन्यांपासून श्रावणबाळ, निराधार योजनेचे मानधन मिळाले नाही तर काही मातांनी निराधार योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र त्यांना अजूनही शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या महिलांना जीवनाच्या सायंकाळी मोठा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अनेक मातांना त्यांच्या आप्तेष्टांनी दूर केल्याने त्यांना जगण्याचा एकमेव आधार म्हणजे शासनाचे श्रावण बाळ योजना, निराधार योजना. या योजनाचे मानधन वेळेवर जमा न झाल्यास या असंख्य महिलांना जगण्यासाठी कसरत करावी लागते. त्यांच्या थकत्या काळात कुणीच मदत करीत नाही तर शासनाच्या या योजनाच त्यांना जीवन जगण्याचे साधन ठरले आहे. मात्र बाबुगिरीमुळे अनेक वृद्ध मातांचे मानधन थकल्याने या मातांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कावड घेऊन त्यात वृद्ध मातापित्यांना ठेवत त्यांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाचा आदर्श समाजापुढे आहे. तरी अनेक वृद्ध माता-पिता उपेक्षित जिणे जगत आहेत. किमान शासन तरी त्यांच्यासाठी श्रावणबाळ ठरावे, अशी अपेक्षा आहे.