वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:22+5:302021-04-23T04:30:22+5:30

सिंदेवाही : सध्या वन्यप्राणी जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये शिरकाव करीत आहेत. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. बिबट गावात ...

Wildlife harms citizens | वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना त्रास

वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना त्रास

सिंदेवाही : सध्या वन्यप्राणी जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये शिरकाव करीत आहेत. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. बिबट गावात येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवितात. या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

शौचालयाअभावी नागरिकांची गैरसोय

कोरपना : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात शौचालयाची व्यवस्थाच नाही. कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालयात नेहमीच अस्वच्छता दिसून येते. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. शासकीय कार्यालयात शौचालयाची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा

कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

राजस्व अभियान सुरू ठेवण्याची मागणी

जिवती : तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात राजस्व अभियान राबविण्यात येत होते. या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजामुळे अनेक प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. आता शाळा महाविद्यालये सुरु झाल्याने त्यांना कागदपत्र लागणार आहेत.

बेरोजगारांना हवा आर्थिक आधार

वरोरा : तालुक्यात बेरोजगारांची संख्या अधिक असून त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. काही महिन्यापूर्वी सामाजिक संस्थेचे बेरोजगार मेळावा आयोजित करून प्रशिक्षण दिले होते. दरम्यान खाणीमध्ये काही कामगार कामाला जातात. मात्र त्यांच्या पाल्यांना काम नसल्याने नोकरीच्या शोधात इतरत्र भटकत आहे.

प्रवासी निवाऱ्यांचा प्रस्ताव तयार

वरोरा : बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते. पण, बसथांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. अनेक ग्रामीण भागातील प्रस्ताव सादर करण्यात आल्याने समस्या सुटणार आहेत.

प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बाखर्डी : औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण

वरोरा : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. लग्नाच्या खरेदीसाठी ग्राहक आता बाजारात येत आहेत. मात्र वाहने रस्त्यावरच ठेवत असल्याने अडचणी वाढत आहेत.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

सावली : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच सावलीतील अनेक विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मुख्य चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या

टेमुर्डा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

माणिकगड पहाड ट्रेकर्ससाठी पर्वणी

जिवती : राजुरा, जिवती, कोरपना तालुक्यात असलेला माणिकगड पहाड हौशी ट्रेकर्ससाठी अद्भुत पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यातील सात बहिणीच्या डोंगरासह याही पहाडाचा विकास साधल्यास पर्यटनदृष्ट्या येथील विकासाला चालना मिळणार आहे.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढला

घुग्घुस : पडोली तसेच अन्य पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने येथील कर्मचाऱ्यांना कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुर्गम भागात रस्ता बांधण्याची मागणी

जिवती : तालुक्यातील आंध्र- महाराष्ट्र सीमेवर असलेले काही गावांत पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यारस्त्याने गावाचा विकास तरच दुरच नागिरकांनाही ये-जा करण्यात अडचणी येत आहे. या गावात रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात होत आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

भद्रावती : काही वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. अनेकजण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने शहरातील काही भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

लांब अंतरावरील बसफेऱ्यांची मागणी

जिवती : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती येथून लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याची मागणी केली जात आहे. जिवती येथून यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अहेरी, चिमूर, ब्रह्मपुरी, नांदेड, लातूर, केरीमेरी, आदिलाबाद मार्गे कोरपना अशा बसेस सोडण्याची मागणी केली जात आहे.

भद्रावती, राजुरा येथे संग्रहालय उभारा

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होतील. या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल.

राष्ट्रीयीकृत बँकेअभावी ग्राहकांची गैरसोय

जिवती : तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या ठिकाणी एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. जिवती हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे नगर पंचायत स्थापन झाली आहे.

रस्त्यावर अंधार

कोरपना : वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरले असते. या मार्गावर पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, तालुका क्रीडासंकुल आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.

नळयोजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण

ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामीण नागरिकांनी पाण्यासाठी भटकावे लागत आहे. बंद असलेल्या नळ योजना प्रशासनाने सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

गडचांदूर-जिवती मार्गावरील खड्डे बुजवा

गडचांदूर : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. परंतु, रस्त्यांची दुरवस्था झाली. त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अवैध वाहतुकीला आळा घालावा

जिवती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसातच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

डासांचा प्रादुर्भाव

बह्मपुरी : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले असल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Wildlife harms citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.