वेकोलिचा ट्रान्सफार्मर चौथ्यांदा जळाला
By Admin | Updated: October 6, 2014 23:09 IST2014-10-06T23:09:34+5:302014-10-06T23:09:34+5:30
माजरी येथे चारवेळा ट्रान्सफार्मर बसवूनही विजेची समस्या जैसे थे आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, कमी अधिक दाबाचा वीज पुरवठा होणे या समस्या अद्यापही सुटलेल्या नाही. वेकोलि क्षेत्रातील

वेकोलिचा ट्रान्सफार्मर चौथ्यांदा जळाला
माजरी : माजरी येथे चारवेळा ट्रान्सफार्मर बसवूनही विजेची समस्या जैसे थे आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, कमी अधिक दाबाचा वीज पुरवठा होणे या समस्या अद्यापही सुटलेल्या नाही. वेकोलि क्षेत्रातील माजरी कॉलरी परिसरात चैतन्य कॉलनीत बसविलेला लाखो रुपयाचा ट्रान्सफार्मर चौथ्यांदा जळाला आहे. याकडे विद्युत अधिकारी दुर्लक्ष करीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची डोळेझाक होत आहे.
विद्युत जनित्र जळाल्याने कॉलनी परिसरातील कर्मचारी दोन दिवस अंधारात राहिले. अंधारात राहण्याची ही चौथी वेळ असून वेकोलिचा विद्युत विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्मचाऱ्यांना अंधारात ठेऊन उच्च पदावर असलेले अधिकारी मात्र झोपत आहे. वीज समस्येमुळे माजरी कॉलनी परिसरातील कर्मचारी त्रस्त आहेत.
समस्या सुटण्याऐवजी त्यात दिवसागणीक भर पडत आहे. वेकोलि कंपनीने चौथ्या वेळीही जूनाच ट्रान्सफार्मर बसविला. त्यामुळे उलट विजेचा लपंडाव वाढला. येथील शांती कॉलनी आणि एलसीएच कॉलनीचा मागील दोन ते तीन महिन्यापासून विद्युत खंडीत होत आहे. दोन महिन्यात चार वेळा लाखो रुपयाचा ट्रान्सफार्मर जळाला. मात्र, याकडे वेकोलिचे दुर्लक्ष होत आहे.
भद्रावती तालुक्यातील कोळसा उद्योगात माजरी हे सर्वात मोठे गाव आहे. माजरी क्षेत्र परिसरात स्थानिक नागरिकांकडून विद्युत चोरी सुरू आहे. मात्र, याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
शांती कॉलनी, तीन नंबर सब स्टेशन, विनायक नगर या सर्व विद्युत स्टेशन मध्ये वीज चोरी होत असून ट्रान्सफार्मरवर भार पडत आहे. त्यामुळे ट्रान्सफार्मर जळत असून याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)