आठवडी बाजार लिलाव प्रक्रियेत विधवा महिलेने केली पुरुषांवर मात
By Admin | Updated: March 27, 2016 00:40 IST2016-03-27T00:40:58+5:302016-03-27T00:40:58+5:30
आठवडी बाजार ठेका लिलाव प्रक्रियेत नेहमी पुरुषांची मक्तेदारी असे. आठवडी बाजारात व्यापारी-शेतकरी, नानाप्रकारचे ग्राहक येतात.

आठवडी बाजार लिलाव प्रक्रियेत विधवा महिलेने केली पुरुषांवर मात
पुरूषांची मक्तेदारी मोडीत : सावलीची महिला ठरली ‘लय भारी’
सावली : आठवडी बाजार ठेका लिलाव प्रक्रियेत नेहमी पुरुषांची मक्तेदारी असे. आठवडी बाजारात व्यापारी-शेतकरी, नानाप्रकारचे ग्राहक येतात. बाजारची फी घेण्यावरुन अनेकदा वाद, हाणामारी होत असते. त्यामुळे बाजार ठेकेदारीत महिला रस घेत नाहीत. पण या परंपरेला एका महिलेने छेद दिला आहे. सर्वाधिक बोली लावून आपल्या नावे ठेका घेतला आहे. सावलीची ही महिला लिलाव प्रक्रियेत सरस ठरल्याने पुरुष मंडळींना रित्या हाताने परतावे लागले.
१८ मार्चला सावली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष रजनी भडके, मुख्याधिकारी पेंदोरकार व नगरसेवकांच्या उपस्थितीत आठवडी बाजार व गुजरी ठेका लिलावाची प्रक्रीया प्रार पडली.
बोली बोलणारे अनेक कंत्राटदार यावेळी उपस्थित होते. त्यात पुरुषांची संख्या अधिक होती. यासोबतच एक विधवा महिला उपस्थित होती. आठवडी बाजारासाठी बोली सुरू झाली. एकावर एक बोली लावत होते. शेवटी महिलेने सर्वाधिक बोली लावून तीन लाख ६० हजार व गुजरीचा ठेका ८० हजार रुपयांत आपल्या नावे करून घेतला.
माधुरी धनवंत संतोषवार असे त्या महिलेचे नाव असून ती सावली येथील रहिवासी आहे. तिला केवळ एका मुलीचा आधार आहे. घरातील कर्ता पुरुष कुणीच नाही. सासू-सासरे-पती यांचे निधन झाल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आली. शेती आहे पण कर्ता पुरुष नसल्याने ती ठेक्याने दिली जाते. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कोणतातरी व्यवसाय करावा लागतो. मग व्यवसाय नेमका कोणता करायचा या विचारात असतानाच ज्यांच्या घरी हा व्यवसाय केल्या जात होता, त्यांचे काम करणारे साथीदार सोबत होते. त्यांच्या हिंमतीवर माधुरीने बाजार लिलाव व गुजरी ठेका घेतला. हा व्यवसाय सहज व सोपा नाही. व्यापाऱ्यांचे बोलणे ऐकावे लागतात. तेथील मजुरी काहीही बोलतात. पण मनात निश्चय व काम करण्याची जिद्द असली की कठीण उद्योगसुद्धा सोपा होतो, हे तिने दाखवून दिले. (शहर प्रतिनिधी)