देवाडा खुर्द येथे भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:30 IST2018-06-04T23:29:35+5:302018-06-04T23:30:00+5:30
तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द गावात दरवर्षी पाणी समस्या उद्भवत असते. गेल्या अनेक वर्षापासून येथे पाणी समस्या असताना याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सध्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी स्थानिक महिला अख्खी रात्र जागून शिवारातील विहीरीचे पाणी आणतात. काही नागरिक बैलबंडीने पाणी आणत असून हातपंप तासन्तास हलवूनही पाणी येत नसल्याने गावकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

देवाडा खुर्द येथे भीषण पाणीटंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द गावात दरवर्षी पाणी समस्या उद्भवत असते. गेल्या अनेक वर्षापासून येथे पाणी समस्या असताना याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सध्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी स्थानिक महिला अख्खी रात्र जागून शिवारातील विहीरीचे पाणी आणतात. काही नागरिक बैलबंडीने पाणी आणत असून हातपंप तासन्तास हलवूनही पाणी येत नसल्याने गावकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या देवाडा खुर्द येथे अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना नळाद्वारे पाणी दिले जाते. परंतु, अंधारी नदीचे पात्र सध्या कोरडे पडले असल्याने स्थानिक नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे. या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत फार खोलवर असल्याने एप्रिल-मे महिन्यामध्येच विहीरी कोरड्या पडतात. तर हातपंपाचे पाणी फार खोलवर जाते. त्यामुळे उन्हाळा आला तर शेतशिवारातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते आणि इतर शेती विषयक कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागते, हे विदारक चित्र गेल्या अनेक वर्षांपासून या गावात कायम आहे.
गावातील भीषण पाणी टंचाईला कंटाळून अनेकजण आपल्या मुलांना नातेवाईकांच्या गावी पाठवितात. माणसांचेच हाल होत असेल तर जनावरांचे काय, असा गंभीर प्रश्न याठिकाणी दरवर्षी निर्माण होतो. बाहेर पाणी पिवून आल्यानंतरही जनावरे घरी आल्यावर पाण्याने व्याकुळ होतात. पण घरी आल्यावर रिकामे टाके असल्याने घराशेजारी जनावरे पाण्यासाठी भटकत राहतात. त्यांच्यासाठी कसेबसे पाणी आणून पाजावे लागते. या परिस्थितीला कंटाळून महिलांच्या तोंडातून हे गाव पाण्यासाठी पापी असल्याचे उद्गार निघत असते.
दरवर्षी उन्हाळा आला की दोर बादली घेऊन लहान मुलांना सुद्धा पाणी आणण्यासाठी लांबवर नेत असतात. तर अनेक महिला पाण्यासाठी चक्क रात्र जागून पाणी भरतात. दरवर्षी या गावात एवढी भीषण पाणी टंचाई सुरू असून सुद्धा या गावात योग्य पाणी पुरवठा कार्यान्वीत करण्यास प्रशासन मात्र कुठलेच पाऊल उचलत नसल्याचे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावकºयांसाठी वर्षभर पाणी पुरवठा करणारी यंत्रणा गावात कार्यान्वीत करावी, अशी मागणी देवाडा खुर्द येथील गावकºयांनी केली आहे.
ग्रामपंचायतीचे प्रयत्न पडले अपुरे
स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अंधारी नदीच्या पात्रात जेसीबीने खोल खड्डा तयार करण्यात आला. परंतु, त्याही ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने अंधारी नदीवरील पाण्याची टाकी कोरडी पडली आहे. त्यामुळे नळाद्वारे येणारे पाणी बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कोरड्या पडलेल्या विहीरीतून दोर बादलीने थोडे थोडे पाणी काढून तासन्तास पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.